महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या (एमपीकेव्ही) अंतर्गत काम करणाऱ्या जळगाव येथील केळी संशोधन केंद्राने (बनाना रिसर्च सेंटर) केळ्याच्या नव्या वाणाची निर्मिती केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना सध्याच्या वाणामुळे होणारे नुकसान कमी होईल.
हे ही वाचा:
सात वर्षांच्या अथक संशोधनानंतर या वाणाची निर्मिती करण्यात यश आले आहे. केळी उत्पादकांना सुमारे दोन दशकांनंतर आता हे वाण उपलब्ध होणार आहे. या वाणाचे नाव ‘फुले प्राईड’ असे ठरविण्यात आले आहे.
एमपीकेव्हीचे वरिष्ठ फलोत्पादन तज्ञ निजामुद्दील शेख यांनी दिलेल्या माहिती नुसार राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या बियाणांचे मानांकन करणाऱ्या संस्थेने या नव्या वाणाला परवानगी दिली आहे.
केळ्याचे सध्याच्या वाणाचे उत्पादन १९९६ पासून घेण्यास सुरूवात झाली होती. मात्र हे वाण पाऊस, सोसाट्याचा वारा यांना झेलण्यासाठी पुरेसे सक्षम नसल्याचे समोर आले.
बीआरसीच्या एका संशोधनानुसार एका जळगाव जिल्ह्यात दरवर्षी सुमारे ₹३० कोटी एवढे केळ्याच्या बागाईतदारांचे नुकसान होते. या एका जिल्ह्यातील सुमारे ३ हजार ६०० हेक्टर जमिनीवरील केळ्यांचे दरवर्षी नुकसान होते. त्यामुळे केळी बागाईतदारांना नव्या वाणाची गरज असल्याचे अधोरेखित होते.
शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या वाणाची १०० टक्के हमी देता येते. नवीन वाण पर्यावरणीय बदलांना तोंड देण्यास अधिक सक्षम आहे.