भारताने मैत्रीला जागत, शेजारील राष्ट्र नेपाळला मोठ्या प्रमाणात कोविड-१९ वरील लसींचा पुरवठा केला आहे. भारत आणि चीन या देशांसाठी राजकीय चालींचे केंद्र असलेल्या नेपाळमध्ये चीनची आर्थिक गुंतवणूक वाढत होती. त्यामुळे नेपाळही चीनच्या बाजूला झुकू लागलेला असतानाच, त्यावर भारतीय लसीचा उतारा लागू पडला आहे. त्यामुळे चीनचा जळफळाट होत असल्याने भारताच्या कृतीची ‘व्हॅक्सिन डिप्लोमसी’ अशा शब्दात संभावना केली आहे.
हिमालयात वसलेला चिमुकला देश नेपाळमध्येही भारताने पाठवलेल्या लसींच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात येणार आहे. बुधवार दिनांक २७ जानेवारी २०२१ पासून सुरू होणारी लसीकरण मोहीम भारताने पाठवलेल्या १ मिलीयन डोसेस नंतर सुरू होत आहे. भारताने शेजारधर्म जपत नेपाळला लसींचा पुरवठा केला होता.
नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडू येथील इस्पितळातील अनेक डॉक्टर्सपासून या लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली आहे. सुरूवातीला नेपाळमधील हजारो वैद्यकीय सेवेतील व्यक्तींना ही लस देण्यात येईल अशी माहिती नेपाळचे काळजीवाहू पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी सांगितले आहे. भारताने ऍस्ट्रा झेन्का या लसीचा पुरवठा नेपाळला नुकताच केला होता. त्यामुळे भारतापाठोपाठ एक आठवड्याच्या अंतरात नेपाळमध्येही लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली आहे. के.पी. शर्मा ओली यांनी भारताकडून योग्य किंमतील लस खरेदी करण्याबाबत बोलणी चालू असल्याची माहिती देखील दिली आहे.
नेपाळ हा भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या मधोमध वसलेला आहे. त्यामुळे आशियातील या मोठ्या देशांसाठी विविध राजकीय चालींचे नेपाळ केंद्र राहिला आहे. भारताने पुरवलेल्या लसींमुळे चीनला धक्का बसला आहे. चीनची सिनोफार्म ही लस अजून निर्मीतीच्या टप्प्यात आहे.
मागील काही वर्षांपासून मालदीव्हस्, श्रीलंका या शेजारी राष्ट्रांमध्ये चीन वेगाने गुंतवणूक करत असताना भारताची यामध्ये दमछाक होत होती. मात्र कोविड-१९ च्या लसींचा पुरवठा करून भारताने आपल्या शेजारील राष्ट्रांशी असलेली आपली मैत्री दाखवून दिली आहे.