भारतातील प्रसिद्ध मसाला ब्रँड एमडीएच आणि एव्हरेस्टच्या चार मसाला उत्पादनांमध्ये इथिलीन ऑक्साईड या कीटकनाशकाचे निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त अंश आढळल्याने हाँगकाँग, सिंगापूर आणि मालदीवमध्ये यावर बंदी घालण्यात आली आहे. अशातच आता आणखी एका देशाने या मसाल्यांच्या आयातीवर आणि विक्रीवर बंदी घातली आहे. नेपाळने हा निर्णय घेत या दोन्ही मासाल्यांवर बंदी घातली आहे.
सिंगापूर, मालदीव, हाँगकाँगनंतर आता नेपाळने एमडीएच आणि एव्हरेस्टच्या मसाल्यांवर कारवाई केली आहे. या मसाल्यांमध्ये हानिकारक इथिलीन ऑक्साईड या कीटकनाशकाचे प्रमाण जास्त असल्याचा आरोप समोर आल्यानंतर नेपाळने या मसाल्यांच्या वापरावर आणि विक्रीवर बंदी घातली आहे. याशिवाय, नेपाळच्या अन्न तंत्रज्ञान आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाने दोन भारतीय ब्रँड मसाल्यांच्या कर्करोगाला कारणीभूत असलेल्या कीटकनाशक इथिलीन ऑक्साईडची चाचणी सुरू केली आहे, असे एएनआयने वृत्त दिले आहे.
नेपाळ फूड टेक्नॉलॉजीचे प्रवक्ते मोहन कृष्ण महाराजन यांनी सांगितले की, “एव्हरेस्ट आणि एमडीएच ब्रँडच्या मसाल्यांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यांच्या बाजारात विक्रीवरही आम्ही बंदी घातली आहे. मसाल्यांमध्ये घातक रसायनांचे नमुने आढळून आल्याच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या दोन विशिष्ट ब्रँडच्या मसाल्यांमधील रसायनांची चाचणी सुरू आहे. अंतिम अहवाल येईपर्यंत बंदी कायम राहणार आहे.”
हे ही वाचा:
इस्लामवादी हिंदू मुलींचे अपहरण करून त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडतात
पाकिस्तान- अफगाणिस्तान सीमेवर संघर्ष उफाळला; डूरंड लाईनवर तालिबान्यांचा हल्ला
“अप्रामाणिकपणा केला असेल तर फाशी द्या”
होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडेला पकडले
एव्हरेस्ट आणि एमडीएच उत्पादनांमध्ये जास्त प्रमाणात इथिलीन ऑक्साईड आढळल्यानंतर काही देशांनी या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. तेव्हापासून या उत्पादनांची भारतात चाचणी सुरू आहे. कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे कर्करोगाचा धोका असतो. एमडीएच ग्रुपच्या मद्रास करी पावडर, सांबार मसाला पावडर आणि करी पावडर या तीन मसाल्यांच्या मिश्रणात इथिलीन ऑक्साईडचं प्रमाण जास्त असल्याचं म्हणणं आहे. एव्हरेस्टच्या फिश करी मसाल्यातही हे कार्सिनोजेनिक पेस्टिसाइड आढळल्याचं म्हटलं जातंय.