नीरज चोप्राला बीसीसीआयकडून १ कोटी

नीरज चोप्राला बीसीसीआयकडून १ कोटी

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्रावर आता चहुबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने नीरज चोप्राच्या या जबरदस्त कामगिरीसाठी त्याला १ कोटीचे इनाम घोषित केले आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव जय शहा यांनी ही इनामांची घोषणा केली. त्यात इतर ऑलिम्पिक पदकविजेत्यांना मिळून एकूण ३कोटींची बक्षिसे बीसीसीआयने जाहीर केली आहेत.

जय शहा यांनी ट्विट करून या इनामांबद्दल माहिती दिली आहे. नीरज चोप्राला १ कोटी हे इनाम जाहीर करतानाच रौप्यपदक विजेत्या वेटलिफ्टर मीराबाई चानू व कुस्तीगीर रविकुमार दहियाला प्रत्येकी ५० लाखांचे इनाम दिले आहे.

बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन, कुस्तीगीर बजरंग पुनिया यांना प्रत्येकी २५ लाखांचे इनाम देण्यात आले आहे.

तर भारतीय पुरुष हॉकी संघाला १.२५ कोटींचे इनामही जाहीर करण्यात आले आहे. या संघाने ऑलिम्पिकमध्ये ब्राँझपदकाची कमाई केली होती.

भारताने यावेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सात पदकांची कमाई केली. त्यात १ सुवर्ण, २ रौप्य व ४ ब्राँझ या पदकांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

आता सहनशक्ती संपली! क्रांतिदिनी होणार आंदोलन

जाहिरात प्रदर्शन नाही, मग करायचं काय?

शेवट ‘गोल्ड’ झाला

नीरज चोप्राचे हे ट्विट ठरले खरे!

नीरज चोप्राने ऑलिम्पिकच्या अखेरच्या दिवशी ही सुवर्णविजेती कामगिरी करताना ८७.५८ मीटर इतकी फेक केली ती इतर प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या तुलनेत सर्वोत्तम ठरली. भारतीय पुरुष हॉकी संघाने ४१ वर्षांनी ब्राँझ जिंकले. तर मीराबाईने वेटलिफ्टिंगमधील पहिले रौप्य भारताला जिंकून दिले. याआधी कर्णम मल्लेश्वरीने भारताला कांस्य जिंकून दिले होते. पी. व्ही. सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य जिंकले होते, यावेळी तिने कांस्य जिंकले. सलग दोन ऑलिम्पिकमध्ये आणि दोन पदके जिंकणारी ती पहिलीच बॅडमिंटनपटू ठरली.

Exit mobile version