संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (UNSC) अध्यक्ष साबा कोरोसी यांनी भारताबाबत मोठे आणि महत्त्वाचे विधान केले आहे. त्यामुळे भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढते महत्त्व लक्षात येते. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताची गरज असल्याचं मत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद अध्यक्ष साबा कोरोसी यांनी व्यक्त केलं. सुरक्षा परिषदेत आणखी चांगल्या प्रतिनिधींची गरज आहे. विशेषतः असे देश, ज्यांच्यावर शांती आणि लोककल्याणाची मोठी जबाबदारी आहे. यामुळेच भारताने या परिषदेचा स्थायी सदस्य होणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले.
एका मुलाखती दरम्यान साबा कोरोसी यांनी भारताविषयी हे मत व्यक्त केलं. “युएनएससीच्या सदस्य देशांमध्ये सध्या चर्चा आहे की, सुरक्षा परिषदेवर अधिक प्रभावी प्रतिनिधींची गरज आहे. यामध्ये अशा देशांचा समावेश व्हायला हवा ज्यांच्यावर शांतता आणि लोककल्याणाची जबाबदारी आहे. शिवाय जगाच्या भल्यासाठी आपलं मोठं योगदान देऊ शकेल अशा देशांमध्ये भारताचा नक्कीच समावेश होतो.”
जेव्हा युएनएससीची स्थापना झाली होती तेव्हा भारत मोठ्या देशांपैकी एक नव्हता. मात्र, सुरक्षा परिषदेमध्ये सध्या सुधारणा करण्याच्या विषयावर चर्चा सुरू असून गेल्या १३ वर्षांपासून याबाबत सदस्य देशांमध्ये बोलणी सुरू आहे. ही प्रक्रिया लांबलेली असून सुरक्षा परिषदेची कार्यपद्धती, सदस्यता, स्थायी सदस्य, व्हीटो अधिकार अशा अनेक बाबतीत सुधारणा गरजेची आहे. सदस्य देशांमध्ये याबाबत एकमत झाले, तर नक्कीच सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणा केली जाऊ शकते, असंही कोरोसी म्हणाले.
हे ही वाचा:
ओडिशा अपघात प्रकरणी चौकशी सुरू असलेला सिग्नल इंजिनिअर कुटुंबासह बेपत्ता
‘तारक मेहता…’ मालिकेच्या निर्मात्यांविरुद्ध गुन्हा दाखल
मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराला आर्थिक रसद?
ठाकरेंच्या अडचणी वाढणार, कॅगच्या अहवालानंतर एसआयटीची स्थापना
कोरोसी यांनी पंतप्रधान मोदींचे केले कौतुक
यावेळी कोरोसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचंही कौतुक केलं. “मी काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो होतो. तेव्हा लक्षात आले की, ते एक दूरदृष्टी असणारे नेते आहेत. आधुनिक भारत कसा दिसायला हवा याबाबत त्यांचं मत स्पष्ट आणि परखड आहे. मला त्यांना भेटून भरपूर आनंद झाला. संयुक्त राष्ट्रांमध्ये त्यांना भरपूर मान मिळतो. कमी कालावधीमध्ये ते जगातील सर्वात सन्मानित नेत्यांपैकी एक झाले आहेत. भारत हा नक्कीच जगातील सर्वात मोठा देश आहे.”