चांद्रमोहिमेच्या करारासाठी नासाने भारताला दिले आमंत्रण

मोदी आणि बायडेन यांनी भारताला नासाच्या आर्टेमिस कार्यक्रमात सामील होण्याबाबत चर्चा केल्यास मोठी चालना

चांद्रमोहिमेच्या करारासाठी नासाने भारताला दिले आमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याला काही दिवस शिल्लक असतानाच नासाच्या अधिकाऱ्यांनी चांद्रमोहिमेच्या आर्टेमिस करारात सहभागी होण्याचे आवाहन भारताला केले आहे. नासाने अमेरिकेच्या नेतृत्वाखाली २०२५पर्यंत मानवाला चंद्रावर पाठवण्याची मोहीम आखली आहे. मंगळ आणि त्यापलीकडील ग्रहांबाबत अधिकाधिक संशोधन करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची या आठवड्यात व्हाइट हाऊसमध्ये भेट होईल, तेव्हा अंतराळ क्षेत्रातील सहकार्य हा चर्चेचा एक महत्त्वाचा भाग असेल, अशी आशा अमेरिकेच्या अंतराळ तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. नासाच्या प्रशासकीय कार्यालयातील तंत्रज्ञान, धोरण आणि सहयोगी प्रशासक भव्य लाल यांनी याबाबत माहिती दिली. ‘आत्तापर्यंत २५ देशांनी या करारावर स्वाक्षरी केली असून भारतानेही या करारात सहभागी होण्यास अनुकूलता दर्शवल्यास तो २६वा देश ठरेल,’ असे ते म्हणाले.

‘अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंधांना पृथ्वीवर जितके गंभीरपणे घेतले जाते, त्याहून अधिक गंभीरपणे त्यांच्या अंतराळातील संबंधांकडे पाहिले जाते,’ असे अमेरिकेतील अंतराळ संशोधक आणि नासा येथे अंतराळ निती आणि भागिदारी विभागाचे माजी सहयोगी प्रशासक असलेले माइक गोल्ड यांनी सांगितले. त्यांनी भारताचे वर्णन ‘सुप्त शक्ती’ असलेला देश असे केले आहे. ‘भारतासाठी आता आकाशाची मर्यादा राहिलेली नाही,’ असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

हे ही वाचा:

मराठी भाषेवरून गुंदेचा हायस्कूलला मनसेचा दणका !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम शाखा करणार समान नागरी कायद्याचा प्रसार

भारतातला ‘मोस्ट वॉन्टेड’ खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरला गोळ्या घातल्या

मनीषा कायंदेंनी दाखवले सुषमा अंधारेंकडे बोट?

आर्टेमिस कराराचे शिल्पकार मानले जाणारे गोल्ड यांनी भारताला अमेरिकेच्या चांद्र मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. भारताच्या गगनयान या मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेत नासा इस्रोला सहकार्य करेल आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक भारतीय अंतराळवीरांसाठी एक गंतव्यस्थान बनेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे, भारत आणि अमेरिका यांनी या वर्षाच्या सुरुवातीला ‘इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी’ (ICET) अंतर्गत मानवी अंतराळ संशोधन आणि व्यावसायिक अंतराळ भागीदारी संदर्भात अनेक क्षेत्रांमध्ये अंतराळसंदर्भात सहकार्य करण्यासंदर्भात सहमती दर्शवली होती. जर मोदी आणि बायडेन यांनी भारताला नासाच्या आर्टेमिस कार्यक्रमात सामील होण्याबाबत तसेच मानवी अंतराळ संशोधनातील सहकार्यावर चर्चा केल्यास याला मोठी चालना मिळेल.

इस्रोचे अंतराळ संशोधन प्रकल्प

भारत काही आठवड्यांत आपली चांद्रयान ३ मोहीम आणि आदित्य एल-१ ही सूर्यमोहीम सुरू करण्याच्या मार्गावर आहे. इस्रो आणि नासा यांनी आतापर्यंत १.५ अब्ज डॉलर खर्च असणाऱ्या निसार (एनआयएसएआर) उपग्रहावर काम केले आहे. हा जगातील सर्वात खर्चिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह कार्यक्रम आहे.

Exit mobile version