लोकसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या यशानंतर नरेंद्र मोदी यांनी रविवार, ९ जून रोजी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनाच्या संकुलात जवळपास आठ हजार मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य सोहळा पार पडला. सिने क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, उद्योग क्षेत्र, राजकीय क्षेत्रांमधील दिग्गजांसह या सोहळ्याला काही विशेष अतिथीही उपस्थित होते. सेन्ट्रल व्हिस्टा प्रकल्पात काम करणारे मजूर, केंद्रीय योजनांचे लाभार्थी, वंदे भारत ट्रेनचे पायलट यांनाही विशेष आमंत्रण देण्यात आले होते. याशिवाय काही शेजारी देशांचे प्रमुखही या सोहळ्याला उपस्थित होते.
या सोहळ्याकडे जगभरातील माध्यमांचे लक्ष होते. हा सोहळा पार पडल्यानंतर जगातील प्रसारमाध्यमे याला दुर्मिळ क्षण म्हणत आहेत. नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या लॉनमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला, ज्यात भारताच्या अनेक शेजारी देशांचे नेते उपस्थित होते.
ब्रिटनच्या माध्यमांमध्ये शपथविधी सोहळ्याचे वर्णन दुर्मिळ क्षण म्हणून
ब्रिटनच्या फायनान्शिअल टाईम्सने आपल्या बातमीत लिहिले आहे की, ‘मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी हसतमुख नरेंद्र मोदींनी गर्दीला नमस्कार केला. उपस्थित लोक त्यांच्या नावाचा जयघोष करत होते.’ हा एक दुर्मिळ क्षण असल्याचे वर्णन करताना, अहवालात म्हटले आहे की, ‘मोदी हे स्वातंत्र्यानंतरचे भारताचे पहिले नेते आहेत जे जवाहरलाल नेहरूंनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत.
अमेरिकन माध्यमांचे मोदींच्या शपथविधी सोहळ्याकडे लक्ष
अमेरिकेच्या एबीसी न्यूजने लिहिले की, “हिंदू राष्ट्रवादी भाजपा २०१४ आणि २०१९ मध्ये प्रचंड बहुमताने जिंकला. ताज्या राष्ट्रीय निवडणुकीत ते स्वबळावर बहुमत मिळवण्यात अपयशी ठरले. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला संसदेत बहुमतासाठी प्रादेशिक मित्रपक्षांच्या पाठिंब्याची गरज पडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अल जझीराने आपल्या अहवालात लिहिले आहे की, भारतातील आर्थिक विषमता वाढू नये यासाठी मोदींवरही दबाव आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था ८.२ टक्के दराने वाढली आहे.
काय म्हणाले पाकिस्तानी माध्यमे?
पीएम मोदींच्या शपथविधीची चर्चा पाकिस्तानी मीडियामध्येही झाली होती. पाकिस्तानच्या जिओ न्यूजने आपल्या अहवालामध्ये लिहिले आहे की, “नरेंद्र मोदी रविवारी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यांच्या कर्तृत्वाची परीक्षा घेणारी युती करून ते सत्तेवर आले आहेत. भाजपचे वैचारिक पालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चे प्रचारक म्हणून सुरुवात करणारे नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरूंनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणारे दुसरे व्यक्ती आहेत.”
हे ही वाचा:
इस्रायलच्या युद्धनियोजन मंत्र्यांचा राजीनामा
भारताच्या गोलंदाजांची जादू चालली; शेवटच्या दोन षटकांत फिरला सामना
जम्मू काश्मीरमध्ये यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला; नऊ जणांचा मृत्यू
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने लिहिले आहे की, “निवडणुकीत धक्कादायक धक्का बसल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशातील आघाडी सरकारमध्ये धोरण निश्चिती सुनिश्चित करण्याच्या त्याच्या क्षमतेची चाचणी घेतली जाईल.