१८ वर्षात नदालला १४ वे फ्रेंच ओपन विजेतेपद

१८ वर्षात नदालला १४ वे फ्रेंच ओपन विजेतेपद

स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालने पुन्हा एकदा फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. रविवार, ५ जून रोजी लाल मातीच्या कोर्टवर फ्रेंच खुल्या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. यात तब्बल १४व्यांदा फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर नदालने आपली मोहोर उमटवली.

रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात नदालने नॉर्वेच्या कॅस्पर रूडवर ६-३, ६-३, ६-० आशा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. शिवाय नदालने आपल्या ३६व्या वाढदिवसाच्या दोन दिवसांनीच या जेतेपदावर कब्जा केला. त्यामुळे फ्रेंच स्पर्धा जिंकणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. नदालच्या नावे आता २२ ग्रँडस्लॅम जेतेपदे असून दुसऱ्या स्थानावरील नोव्हाक जोकोव्हिच आणि रॉजर फेडरर यांनी प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.

नदालने उपांत्यपूर्व फेरीत प्रतिस्पर्धी जोकोव्हिचचा पराभव केला. त्यानंतर उपांत्य फेरीत अलेक्झांडर झ्वेरेव्हने दुखापतीमुळे अर्ध्यातून माघार घेतल्याने नदालने आगेकूच केली. अंतिम सामन्यात नदालने आठ वेळा रूडची सर्व्हिस मोडली.

वयाच्या ३६व्या वर्षी आणखी एका ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळेन आणि जिंकेन असे वाटले नव्हते. मात्र, अत्यंत आनंद झाला असून भविष्यात काय होईल माहिती नाही; पण खेळत राहण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याच्या भावना राफेल नदाल याने विजयी झाल्यावर व्यक्त केल्या.

हे ही वाचा:

नायजेरियात चर्चमध्ये झालेल्या गोळीबारात ५० जणांचा मृत्यू

रशिया- युक्रेन युद्धाच्या १०० दिवसांचा आढावा

उत्तरकाशीत बस दरीत कोसळून २५ भाविकांचा मृत्यू

मध्य प्रदेशच्या सुजालपूरमध्ये लव्ह जिहादचा प्रकार, मुलीचा झाला मृत्यू

राफेल नदालने वयाच्या १९व्या वर्षी २००५ मध्ये पहिल्यांदा फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. त्यानंतर १८ वर्षांच्या कालावधीत नदालने १४ वेळा ‘रोलँड गॅरॉस’च्या चषकावर आपले नाव कोरले आहे. नदालला गेल्या काही वर्षांत विविध दुखापतींना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे त्याच्या यंदाच्या स्पर्धेतील सहभागावरही प्रश्नचिन्ह होते. मात्र, या दुखापतींवर मात करत त्याने यश मिळवले.

Exit mobile version