म्यानमारमध्ये दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत चालली आहे. त्याचे परिणाम भारतावरही होऊ लागले आहेत. जुंटाविरोधी गटाच्या हल्ल्यानंतर २९ सैनिक सीमा पार करून भारताचे ईशान्य राज्य मिझोरममध्ये पोहोचले आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही याबाबत चिंता व्यक्त करून हे सर्व तत्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.
सन २०२१मध्ये म्यानमारच्या लष्कराने आंग सान सू की यांच्या सरकारला पदच्युत करून स्वतः देशाची सूत्रे हाती घेतली होती. तिथपासूनच देशात लोकशाहीसमर्थक संघटना आणि जुंटा सरकार दरम्यान हिंसाचाराच्या घटना होत आहेत. ऑक्टोबरमध्ये या घटना वाढू लागल्या आहेत. म्यानमारचा एक गट अराकन आर्मीने रखाइनमध्ये हल्ला करून लष्करी सरकारवर दबाव आणण्यास सुरुवात केली होती.
हे ही वाचा:
कांदिवली पूर्व विधानसभेत छठ पूजा उत्सव उत्साहात
पुण्यात कोयता गँगची दहशत; पाठलाग करत इमारतीच्या छतावर तरुणाची हत्या
भारत पराभूत झाला, पण ऑस्ट्रेलिया का जिंकली?
गाझामधील सर्वात मोठ्या रुग्णालयाखाली सापडला ५५ मिटरचा बोगदा
मिलिशिया समूह ‘पीपल्स डिफेन्स फोर्स’सोबत भीषण संघर्षानंतर मिझोरममध्ये पळून आलेल्या म्यानमारच्या २९ सैनिकांना रविवारी त्यांच्या देशात परत पाठवले गेले. आतापर्यंत मिलिशया समूहाने लष्कराच्या शिबिरावर केलेल्या हल्ल्यानंतर भारतात पळून आलेल्या म्यानमारच्या एकूण ७४ सैनिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्यात आले आहे.
२७ ऑक्टोबरपासून अराकन लष्कराने ईशान्य म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ले सुरू केले होते. या हल्ल्यांत म्यानमार नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स आणि तांआंग नॅशनल लिबरेशन आर्मीही त्यांना साथ देत आहे. या समूहाने स्वतःला थ्री ब्रदरहूड अलायन्स जाहीर केले आहे. तर, म्यानमारच्या लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
सन २०२१पासून म्यानमारमध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतर मोठ्या संख्येने म्यानमारचे नागरिक भारतात शरण घेत आहेत. म्यानमार आणि भारतादरम्यान १६४० किमीची सीमा आहे. सन २०२१नंतर म्यानमारमधील ३१ हजारांहून अधिक नागरिक मिझोरममध्ये शरणार्थी म्हणून आल्याचे सांगितले जात आहे.