सन २०२३पर्यंत भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या २० कोटी आहे, अशी माहिती केंद्र सरकारने गुरुवारी लोकसभेत दिली. तृणमूल काँग्रेसच्या खासदार माला रॉय यांनी या संदर्भात लोकसभेत माहिती विचारली होती. ‘सन २०११च्या जनगणनेनुसार, मुस्लिमांची संख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत १४.२ टक्के आहे.
याच प्रमाणानुसार, सन २०२३ची मुस्लिमांची संख्या मानली जात आहे,’ अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री स्मृती इराणी यांनी लेख उत्तरात दिली. ‘सन २०११च्या जनगणनेनुसार, मुस्लिमांची संख्या १७.२ कोटी होती. जुलै २०२०मध्ये तांत्रिक गटाने केलेल्या जनगणनेच्या अनुमानानुसार, भारताची लोकसंख्या सन २०२३मध्ये १३८.८ कोटी आहे. सन २०११मधील मुस्लिम लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येपैकी प्रमाण १४.२ टक्के होते. त्यामुळे हेच प्रमाण गृहित धरल्यास सन २०२३मध्ये मुस्लिमांची लोकसंख्या १९.७ कोटी असेल,’ अशी माहिती इराणी यांनी दिली.
हे ही वाचा:
प्रवाशांना अत्यल्प दारात जेवण मिळणार
एनडीएच्या घटक पक्षांच्या खासदारांचे १० गट करून पंतप्रधान करणार चर्चा
इर्शाळवाडीमध्ये बचावकार्याला सुरुवात; ५० ते ६० जण अजूनही ढिगाऱ्याखाली
दोन प्रकारच्या सेक्स सीडी, बीभत्स आणि राजकीय
इराणी यांनी मुस्लिमांमधील साक्षरतेचा दर, त्यांना करावे लागणारे मजुरीचे काम, तसेच, त्यांना पाणी, शौचालये आणि घरे या पायाभूत सुविधा किती मिळतात, याबाबतही माहिती दिली. मात्र पसमंदा मुस्लिमांच्या लोकसंख्येबाबत त्यांनी मौन बाळगले. माला यांनी ३० मेपर्यंतची एकूण मुस्लिमांची लोकसंख्या, पसमंदा मुस्लिमांची संख्या आणि त्यांचा देशातील सामाजिक-आर्थिक स्तर याबाबत माहिती मागितली होती.
मंत्रालयाच्या सांख्यिकी आणि प्रकल्प अंमलबजावणी कार्यक्रमांतर्गत सन २०२१-२२मध्ये श्रमिकांच्या नियमित केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणात आढळलेल्या नोंदींची माहिती इराणी यांनी दिली. ‘सात वर्षे आणि त्यापुढील मुस्लिमांमधील साक्षरतेचा दर ७७.७ टक्के आहे आणि सर्व वयोगटातील श्रमिकांचे प्रमाण ३५.१ टक्के आहे. तसेच, चांगले पाणी मिळणाऱ्या मुस्लिमांचे प्रमाण ९४.९ टक्के असून ९७.२ मुस्लिमांना शौचालयाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, ३१ मार्च २०१४नंतर प्रथमच नवे घर किंवा फ्लॅट घेणाऱ्या किंवा बांधणाऱ्या मुस्लिमांचे प्रमाण ५०.२ टक्के आहे,’ असे इराणी यांनी सांगितले.