अफगाणिस्तानमध्ये कलाक्षेत्रावर अवकळा!

अफगाणिस्तानमध्ये कलाक्षेत्रावर अवकळा!

अफगाणिस्तानमधील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे अफगाणिस्तानच्या सर्वच क्षेत्रांवर त्याचा परिणाम झाला आहे. अफगाणिस्तानमधील नावाजलेली चित्रपट निर्माती सहरा करिमी हिने तिकडच्या चित्रपट क्षेत्राची आणि एकूणच सांस्कृतिक घडामोडींची झालेली दुर्दशा समोर आणली आहे. तालिबान्यांनी १५ ऑगस्टला काबूलवर कब्जा केला तेव्हा करिमी बँकेच्या रांगेत उभ्या होत्या. त्यादरम्यान झालेल्या गोळीबाराच्या आवाजाने आणि काबूलवर केलेला कब्जा या बातम्यांमुळे सर्वांमध्ये घबराट निर्माण होऊन लोकांनी मिळेल त्या मार्गाने बँकेजवळून पळ काढला. त्यांनी स्वतः पहिले घरी जाऊन नंतर विमानतळ गाठले, असे सहरा करिमी म्हणाल्या.

सहरा करिमी यांनी त्यांच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याच्या सहाय्याने त्यांच्या सुटकेचा ४० तासांचा थरार चित्रित केला असून तो त्या एखाद्या चित्रपटात घेऊ इच्छित आहेत. त्या एका चित्रपटाची निर्मिती करत होत्या, मात्र त्यांना ते काम, घर आणि त्यांचे इतर सामान तिथेच सोडावे लागले. करिमी या अफगाण चित्रपट संघटनेच्या प्रथम महिला अध्यक्ष होत्या. त्यांनी देशातील मागे राहिलेल्या इतर चित्रपट निर्मात्यांविषयी काळजी व्यक्त केली आहे. तालिबानी हे संस्कृती विरोधी आहेत. त्यांना सिनेमा, संगीत आणि कला अशा सर्वांचा तिरस्कार आहे, असे करिमी म्हणाल्या.

करिमी यांच्या प्रमाणेच देशाच्या सांस्कृतिक ठेव्यावर काम करणारे इतर लोकही चिंतित आहेत. संग्रहालयातील पुस्तके, अर्धवट राहिलेले सिनेमे, अर्धवट राहिलेली चित्रे तसेच ८० हजारपेक्षा जास्त वस्तू अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय वास्तुसंग्रहालयात पडून आहेत. जुलै महिन्यात तालिबान्यांनी प्रसिद्ध हास्य कलाकार नजर मोहम्मद यांची हत्या केली होती. ऑगस्ट महिन्यात गायक फवाद यांची हत्या झाली होती. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय संगीत संस्थेतील वाद्ये तुटलेल्या स्थितीत सापडली होती. देशातील महिला वादकांनी भीतीपोटी स्वतःकडील वाद्ये तोडून टाकली आणि त्यांचे काही जुने फोटोही नष्ट केले होते.

हे ही वाचा:
आंतरराष्टीय दहशतवादी आज घेणार शपथ
आली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा….
… निर्दोष असूनही तो ४०० दिवस अडकला इराणमध्ये
पंतप्रधान आमच्याशी आपुलकीने बोलतात, याचे परदेशी खेळाडूंना कौतुक वाटते!

अफगाणिस्तानमधील लेखक आणि संसदेचे माजी सदस्य मोहाउद्दीन मह्दी यांनी काबूलमध्ये वाचनालय उभारले होते. वाचनालयात साहित्य, भूगोल, धर्म, कविता अशा अनेक विषयांवरील सुमारे १२ हजाराहून अधिक पुस्तके होती. त्यातील अनेक पुस्तके ही पर्शियन, पाश्तो आणि उर्दूमध्ये होती. भारत, पाकिस्तान, ताजिकीस्तान, इराण आणि तुर्की इथून ही पुस्तके आणली होती. तालिबान्यांनी १९९६ मध्ये हे वाचनालय तीन हजार पुस्तकांसह जाळून टाकले होते. आताही पुन्हा तालिबानी या वाचनालयाला लक्ष्य बनवण्याची शक्यता आहे, त्यामुळे वाचनालयातील पुस्तके आणि इतर महत्त्वाच्या वस्तू लपवून ठेवल्याचे मह्दी यांचा मुलगा ओबाईदुल्ला यांनी ‘टाइम्स’शी बोलताना सांगितले.

अफगाणिस्तानमधील २००१ नंतरचा सांस्कृतिक प्रवास हा वेगळा होता. करिमी यांचा पहिला चित्रपट व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला होता. राष्ट्रपती भवनात अफगाण चित्रपटांचा संग्रह आहे, त्याच्याविषयी चिंता करिमी यांनी व्यक्त केली आहे आणि तो ठेवा वाचवण्यासाठी मोहीम आखण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version