पेट्रोल, डिझेलमुळे वाढणारे प्रदूषण आणि वाढती महागाई यांच्यावरील उपाय म्हणून सध्या इलेक्ट्रिक वाहनांकडे पाहिले जाते. जगभारत या वाहनांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मुंबईतही या वाहनांच्या चार्जिंगचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने दादरच्या कोहिनूर टॉवरमध्ये सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्र सुरू केले आहे. ऑटोपार्क मोबाईल ऍप्लिकेशनच्या मदतीने वाहनचालक ऑनलाईन पार्किंग आरक्षित करू शकतील.
दादरच्या कोहिनूर टॉवरमध्ये पालिकेचे मोठे ‘पे अँड पार्क’ असून तिथे चार्जिंग केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर चार्जिंग, गाडी धुणे, ऑनलाईन आरक्षण करणे, ड्रायव्हरला बसण्यासाठी जागा आणि उपाहारगृह अशा सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या केंद्रावर सर्व कंपनींची दुचाकी, तिचाकी आणि चारचाकी इलेक्ट्रिक वाहने चार्ज करता येतील. अशा सर्व सुविधा देणारे हे मुंबईतील पहिले इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्र आहे.
हे ही वाचा:
काबुल विमानतळाची भिंत नवी बर्लिनची भिंत?
अफगाणिस्तान विषयावर मोदींनी घेतली महत्वाची बैठक
तालिबानचे ‘उदार’ धोरण एका दिवसात बंद
अमरूल्ला सालेह झाले अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती! पण कसे?
केंद्रावर दोन डीसी जलद चार्जर (एक ते दीड तासात वाहन पूर्ण चार्ज) ज्यावर एकावेळी चार गाड्या चार्ज होतील. तीन एसी संथ चार्जर (सहा ते सात तासात वाहन पूर्ण चार्ज) ज्यावर एका वेळी तीन वाहने चार्ज होतील, अशी चार्जिंगसाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाहन पूर्ण चार्ज होण्यासाठी २० ते ३० युनिट्स वीज लागते. त्याचा खर्च सुमारे २०० ते ४०० रुपये येईल आणि चार्ज केलेली वाहने १४० ते १७० किलोमीटर धावू शकतात.
चार्जिंगचे केंद्र चोवीस तास खुले असणार आहे. चालकांना वाहनासाठी ताशी किंवा मासिक आरक्षण करता येईल. कोहिनूर वाहनतळाच्या पार्किंगमध्येच कार धुण्याची आणि पॉलिश करण्याची सुविधा असणार आहे. केंद्रावरील उपाहारगृह सुरक्षित आणि अग्निरोधक असून ते सकाळ ते संध्याकाळ सेवेसाठी खुले असणार आहे.