मुंबई आणि महाराष्ट्राचा साहसी जलतरणपटू प्रभात कोळीने आणखी एक पराक्रम केला असून त्याने आता न्यूझीलंडमधील कूक स्ट्रीट पार करत जगातील सात समुद्र ओलांडणारा तरुण जलतरणपटू ठरण्याचा मान मिळविला आहे. प्रभातला यापूर्वीच त्याच्या सागरी जलतरणातील जबरदस्त कामगिरीबद्दल तेनझिंग नॉर्गे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. आता त्याच्या कामगिरीत या नव्या पराक्रमाची भर पडली आहे.
२३ वर्षीय प्रभातने ८ तास आणि ४१ मिनिटे अशी वेळ देत बुधवारी ही ऐतिहासिक कामगिरी केली.
सात समुद्र ओलांडण्याची कामगिरी ही सागरी जलतरण करणाऱ्यांसाठी एक मोठे आव्हान असते. त्यासाठी आवश्यक ते मानसिक आणि शारीरिक बळ हवे असते. गिर्यारोहण क्षेत्रात प्रत्येक खंडातील सर्वोच्च शिखर चढून जाण्याचा पराक्रम जसा केला जातो, तशाच पद्धतीचा हा पराक्रम आहे.
प्रभातने आतापर्यंत इंग्लिश खाडी (इंग्लंड आणि फ्रान्सच्या दरम्यान), नॉर्थ चॅनल (आयर्लंड आणि स्कॉटलंडमध्ये), जिब्राल्टरची सामुद्रधुनी (स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर, स्पेन आणि मोरेक्कोदरम्यान), कॅटलिना चॅनेल (सांता कॅटलिना आणि कॅलिफोर्नियादरम्यान), मोलोकाई चॅनेल (मोलोकाई आणि ओआहू हवाई, अमेरिका), सुगारो चॅनेल (होन्शू आणि होकायडू, जपान यादरम्यान), कूकची सामुद्रधुनी (नॉर्थ आणि साऊथ आयलंड, न्यूझीलंड)
हे ही वाचा:
सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली, दिल्लीतील रुग्णालयांत केले दाखल
नितेश राणेंचा चिमटा आणि विधानसभा अध्यक्ष म्हणाले अनोळखी भटक्या कुत्र्यांवर कारवाई नाही!
दिवसातून पाच वेळा नमाज आणि रोज दोन झाडे लावण्याची सलग २१ दिवस शिक्षा
देशपांडेंवरील हल्ल्यानंतर मनसे झाली आक्रमक
यासंदर्भात प्रभातने सांगितले की, सात समुद्र ओलांडणारा सर्वात तरुण खेळाडू ठरलो याचा इतका आनंद आहे की तो शब्दात सांगता येणार नाही. अजूनही माझा यावर विश्वासच बसत नाही. प्रारंभी वातावरण छान होते पण ३-४ तास पोहल्यानंतर लाटा उसळू लागल्या आणि मला पोहणे कठीण होऊ लागले. मात्र ८ तास आणि ४१ मिनिटांनी निर्धारित लक्ष्य पार केले. मग भारतीय तिरंग्यासह मी या संकल्पपूर्तीचा आनंद साजरा केला.
२०१८मध्ये प्रभातने नॉर्थ चॅनेल पार केला तेव्हा तो ही कामगिरी करणारा जगातील सर्वात तरुण जलतरणपटू ठरला होता.
आता पुढील वर्षी आईस स्वीमिंग जागतिक स्पर्धेत सहभागी होण्याचा त्याचा मनसुबा आहे. हे जलतरण बर्फाच्या पाण्यात करायचे आहे. ५ अंश सेल्सियसपेक्षाही कमी तापमानाच्या पाण्यात ही कामगिरी करून दाखवायची आहे. भारताचे नाव याठिकाणीही उज्ज्वल करण्याचे माझे प्रयत्न असतील.
याआधी रोहन मोरेने सात समुद्र ओलांडण्याचा पराक्रम केला आहे. ती कामगिरी करणारा प्रभात हा दुसरा भारतीय आहे.