मुंबईतील प्रसिद्ध प्राणिसंग्रहालय- वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान- सामान्य जनतेसाठी लवकरच उघडण्यात येणार आहे. कोरोना खबरदारीचा उपाय म्हणून सुमारे ११ महिने बंद असलेले हे उद्यान पुन्हा एकदा लवकरच सर्वांसाठी खुले होणार आहे. १५ फेब्रुवारी २०२१ पासून हे प्राणिसंग्रहालय पुन्हा एकदा सामान्य नागरिकांनी गजबजून जाणार आहे.
हे ही वाचा:
सध्या प्राणिसंग्रहालयाचे प्रशासन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून याबाबतचे निर्देश प्राप्त होण्याच्या प्रतिक्षेत आहे. प्राणिसंग्रहालय जरी उघडले तरी त्यातील पक्ष्यांचे पिंजरे मात्र पर्यटकांसाठी बंदच राहणार आहेत. बर्ड फ्लूचा धोका लक्षात घेऊन हा खबरदारीचा उपाय करण्यात आला आहे. त्यामुळे यातील वाघ, पेंग्वीन आणि इतर प्राण्यांचे पिंजरेच पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहेत. महानगरपालिकेने चित्रपटगृहे, मॉल्स, दुकाने यांना यापूर्वीच परवानगी दिली असल्याने यावेळेस प्राणिसंग्रहालयही उघडले जाण्याची शक्यता आहे.
प्राणिसंग्रहालय उघडल्यानंतरही, कोविडच्या खबरदारीचे उपाय जसे की मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग यांचे पालन करावे लागणार आहेच. त्याशिवाय प्राणिसंग्रहालयाच्या वेळांमध्येही बदल करण्यात आलेला नाही.
शिवजयंतीवर मात्र निर्बंध
एकीकडे महानगरपालिका एक एक सुविधा नागरिकांसाठी उघडत आहे. १ फेब्रुवारीपासून ठराविक वेळेत का होईना पण लोकलही सामान्यांसाठी खुल्या करण्यात आल्या. तरीही राज्य सरकारने घातलेले शिवजयंतीच्या उत्सवावरील निर्बंध मात्र कायम आहेत. मात्र त्यावर तीव्र विरोध प्रकट झाल्यानंतर हे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत.