नायर रुग्णालयात कोविड-१९ची लस टोचून घेतल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी मुंबईची लोकल सेवा पूर्ववत सुरू करण्याचे संकेत दिले.
त्यांनी पत्रकारांना दिलेल्या माहिती नुसार, मुंबईची सेवा सुरू झाल्यानंतर ते सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
१ फेब्रुवारी पासून सर्वसामान्यांसाठी लोकल चालू केल्या असल्या तरीही त्यांच्या वेळा प्रवाशांसाठी गैरसोयीच्या आहेत. सध्या सर्वसामान्य प्रवाशांना पहिल्या गाडीपासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत नंतर दुपारी १२ ते ४ आणि रात्री ९ वाजल्यानंतरच गाडीतून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या वेळा प्रवाशांसाठी गैरसोयीच्या आहेत कारण ऑफिसला पोहोचण्यासाठी याचा उपयोग होत नाही.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाड्या सर्वांसाठी खुल्या झाल्या असल्या तरीही त्यामुळे शहरात कोविडचा उद्रेक झालेला नाही. मात्र याचा अर्थ असा नाही, की यापुढे आपण मास्क वापरणे सोडणार आहोत, किंवा सॅनिटायझर वापरणे सोडणार आहोत. ते आपल्याला चालू ठेवावे लागणारच आहे.
याबरोबरच काकणी यांनी हे देखील सांगितले की ३१ मार्च पर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेची कोविड केंद्रे आणि जम्बो कोविड केंद्र चालूच राहणार आहे. बृ.मुं.म.पाच्या सर्व वैद्यकिय अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की आम्ही गाड्यांच्या वेळांच्या पुनर्रचना करण्याबाबत विचार करित आहोत. माझ्या विभागाकडून याबाबतच्या सुचना जारी केल्या जातील.