आता शहाण्यांनी ‘कोर्टाची’ पायरी चढायला हरकत नाही…

आता शहाण्यांनी ‘कोर्टाची’ पायरी चढायला हरकत नाही…

शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात पण मुंबई उच्च न्यायालयाची पायरी आता प्रत्येकाने चढायला हरकत नाही. कारण या न्यायालयाच्या इमारतीला हेरिटेज वास्तूचा दर्जा प्राप्त झाला असून ती इमारत पाहण्यासाठी आता १६  ऑक्टोबरपासून खुली केली जाणार आहे. यासंदर्भातील माहिती नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे.

हा उपक्रम पर्यटन संचालनालय (DOT) मुंबई उच्च न्यायालय आणि पर्यटक मार्गदर्शक संघटनेच्या सहकार्याने राबवत आहे.

दूरसंचार विभागाने जारी केलेल्या निवेदनात ही इमारत बघण्याची परवानगी आता पर्यटकांना मिळणार असल्याचे म्हटले आहे. शनिवार व रविवार सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत पर्यटक या इमारतीत येऊ शकतील. या प्रत्येक ‘हेरिटेज यात्रे’चा कालावधी एक तासांचा असणार आहे. मराठी, इंग्रजी आणि हिंदीमध्ये शनिवार आणि रविवारी एकूण या हेरिटेज पर्यटनाचे आयोजन केले जाईल. तसेच भारतीय पर्यटकांसाठी प्रति ट्रिप १०० रुपये (कर अतिरिक्त) प्रवेश शुल्क असेल तर परदेशी पर्यटकांसाठी २०० रुपये (कर अतिरिक्त) आकारले जातील.

प्रधान सचिव (पर्यटन) वल्सा नायर सिंह यांनी सांगितले की, या वास्तूचा समृद्ध वारसा, इतिहास आणि वास्तुकलेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विभागाने उच्च न्यायालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या मान्यतेने व मार्गदर्शनाने ‘हेरिटेज यात्रा’ सुरु केलेली आहे. मुंबईमध्ये देशभरातील पर्यटक या ना त्या कारणाने येत असतात. त्यांच्यासाठी ही यात्रा नक्कीच आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार यात शंकाच नाही.

 

हे ही वाचा:

क, ड संवर्ग पदभरती प्रक्रियेला गोंधळाचा संसर्ग

मुख्यमंत्र्यांनी केवळ गरळ ओकली

आजपासून झी वाहिनीवर घुमणार सप्तसूर

बांगलादेशातील इस्कॉन मंदिरावर धर्मांधांचा हल्ला!

 

मुंबई उच्च न्यायालय हे देशातील सर्वात जुन्या उच्च न्यायालयांपैकी एक आहे आणि १४ ऑगस्ट १८६२ रोजी त्याचे उद्घाटन झाले. विद्यमान इमारतीचे काम एप्रिल १८७१ मध्ये सुरू झाले आणि नोव्हेंबर १८७८ मध्ये पूर्ण झाले. २०१८ मध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीत त्याचा समावेश होता.

Exit mobile version