पूर्व आफ्रिकेतील केनिया देशात मोठी दुर्घटना घडली आहे. या देशात धरण फुटल्याने मोठे संकट उभे राहिले आहे. अतिवृष्टी झाल्याने येथील एक धरण फुटल्याची माहिती आहे. यामध्ये जवळपास ४० हून अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, तर अनेक व्यक्ती अद्यापही बेपत्ता आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. बचावपथक घटनास्थळी दाखल झाले असून नागरिकांना रेस्क्यू करण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या अधिक महितीनुसार, केनिया देशाची राजधानी नैरोबीपासून ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या माई महियू गावात ही धरणफुटीची घटना घडली आहे. रात्री ही दुर्घटना घडली असून यावेळी नागरिक झोपेत असताना धरण फुटले. त्यामुळे अनेक जण झोपेतच वाहून गेले आहेत. संपूर्ण गावात चिखल आणि गाळ साचला आहे. यामुळे बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुसळधार पावसामुळे रस्ता खचला आणि धरण फुटल्याने यामध्ये संपूर्ण गाव पाण्याखाली गेलं आहे. अनेकांची घरंदेखील वाहून गेली आहेत. गावात सध्या पूरसदृश्य परिस्थिती असून ठिकठिकाणी मोडलेली घरं, झाडं आणि सर्वत्र चिखल पसरल्याचं दिसत आहे. नागरिक आपल्या जवळच्या व्यक्तींना शोधण्यासाठी धडपड करत आहेत. मुसळधार पाऊस झाल्याने रस्त्याचा काही भाग देखील खचला आहे. त्यामुळे बचाव पथकाला गावात प्रवेश करण्याआधी खचलेल्या रस्त्यातून वाट काढावी लागत आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासनूच या गावामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर आणखी भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.