‘मोदीजी, आम्हाला पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त करा’

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घोषणा

‘मोदीजी, आम्हाला पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त करा’

पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहणाऱ्या काश्मीरवासींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आम्हाला पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त करा, असे साकडे घातले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या तीव्र निदर्शने होत आहेत. महागाईचा उच्चांक, अन्नपदार्थांचा तुटवडा आणि कंबरडे मोडणारे कर यामुळे पाकव्याप्त काश्मीरमधील शहरे आणि गावांमध्ये लोक रस्त्यांवर उतरले आहेत. या तीव्र निदर्शनांसाठी काश्मीरचे सामाजिक कार्यकर्ते शब्बीर चौधरी यांनी पाकिस्तानला दोषी मानले आहे.

महागाई, वीज खंडित होणे, अन्नपदार्थांची असुरक्षा आणि अन्य समस्यांनी नागरिक त्रस्त असताना आता त्यांच्यावर आणखी कर लादले जात असल्याने पाकव्याप्त काश्मिरींमध्ये तीव्र असंतोष आहे, असे स्पष्टीकरण चौधरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या नव्या व्हिडीओमध्ये दिले आहे.

पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिक पाकिस्तानमधून मुक्त होण्यासाठी पंतप्रधान मोदींकडे मदत मागत असल्याची कबुलीही त्यांनी दिली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगा, आम्हाला पाकिस्तानपासून मुक्ती द्या, असा घोषणा पाकव्याप्त काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या लोकांनीही ऐकल्याचे सांगण्यात येते.

‘आम्हाला वाचवा, आम्ही भुकेने तडफडत आहोत. कृपया इकडे या आणि आमची मदत करा’, अशा घोषणा ते देत आहेत. पाकिस्तानही या घोषणांनी त्रस्त झाला आहे. पाकिस्तान सरकार पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तानमध्ये राहणाऱ्या लोकांना दुय्यम वागणूक देत आहे, असा आरोप पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी केला आहे.

हे ही वाचा:

जळगावच्या भाषणात उद्धव ठाकरेंची जळजळ

भारताच्या ‘RRR’ चित्रपटाने ब्राझीलच्या अध्यक्षांना केले मंत्रमुग्ध !

४६ बालकांवर होणार मोफत हृदय शस्त्रक्रिया

‘स्वस्ती अस्तु विश्व’ हा संदेश देत जी-२०चा समारोप !

रोख गंगाजळीच्या तुटवड्याने हैराण झालेल्या पाकिस्तानमध्ये विजेची किंमत गेल्या तीन महिन्यांत दुप्पट झाली आहे. त्यामुळे या बाबत सर्वत्र संतापाचे वातावरण असून ठिकठिकाणी निदर्शने होत आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये गव्हाचे पीठ आणि अन्य आवश्यक वस्तूंवर लावण्यात आलेल्या करांमुळेही लोक त्रस्त झाले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिक गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या कुशासनामुळे त्रस्त आहेत.

Exit mobile version