आर्थिक गुन्हेगारांना भारतात कसे पाठवता येईल? मोदी-सुनक झाली चर्चा

लवकरात लवकर दोन्ही देशांदरम्यान परस्परांना फायदेशीर ठरेल असा मुक्त व्यापार करार

आर्थिक गुन्हेगारांना भारतात कसे पाठवता येईल? मोदी-सुनक झाली चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला आणि त्यात प्रामुख्याने चर्चा झाली ती ब्रिटनमध्ये आश्रय घेतलेल्या आर्थिक गुन्हेगारांचे काय करायचे या मुद्द्यावर. विजय मल्ल्या, नीरव मोदी यांच्यासारखे आर्थिक गुन्हेगार भारतात अनेक घोटाळे करून ब्रिटनमध्ये लपून बसले आहेत. सध्या त्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, न्यायालयीन प्रक्रियाही सुरू आहेत. पण त्यासंदर्भात आणखी कोणती पावले उचलता येतील, याबाबत पंतप्रधान मोदी यांनी सुनक यांच्याशी संवाद साधला.

भारत-इंग्लंड आराखडा २०३० चा भाग म्हणून सुरु असलेल्या अनेक द्विपक्षीय मुद्यांबाबतच्या प्रगतीचा दोन्ही नेत्यांनी यावेळी आढावा घेतला. तसेच लवकरात लवकर दोन्ही देशांदरम्यान परस्परांना फायदेशीर ठरेल असा मुक्त व्यापार करार करण्याच्या गरजेवर दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली.

 

खलिस्तानी समर्थकांच्या हल्ल्यासंदर्भातही झाला संवाद

इंग्लंडमधील भारतीय राजनैतिक आस्थापनांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करून पंतप्रधान मोदी यांनी ब्रिटीश सरकारने भारत-विरोधी घटकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली. युकेमधील भारतीय उच्चायुक्तालयावर झालेला हल्ला युके सरकारला संपूर्णपणे अस्वीकारार्ह आहे असे सांगून पंतप्रधान ऋषी सुनक यांनी भारतीय कार्यालय आणि त्यात कार्यरत अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेची ग्वाही पंतप्रधान मोदी यांना दिली. खलिस्तानी समर्थकांनी मध्यंतरी भारतीय दूतावासावर हल्ला केला होता तसेच तिरंग्याचा अपमानही त्यांनी केला. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी हा विषय ब्रिटनच्या समोर मांडला आहे.

हे ही वाचा:

ठाणे – बोरिवली प्रवासाचा वेळ वाचणार, दुहेरी बोगदा बांधकामाला मिळणार वेग

आधी सावरकरांची माफी मग, मगच महाराष्ट्रात पाऊल ठेवा!

भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे!

देशातील नवीन कोरोना रुग्णांची ११ हजारांच्या पुढे; सक्रिय रुग्णांची संख्येतही लक्षणीय वाढ

युकेमध्ये आश्रय घेतलेल्या आर्थिक गुन्हेगारांचा मुद्दा देखील पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला. या आरोपींना भारतीय न्याय व्यवस्थेसमोर हजर करण्याच्या दृष्टीने त्यांना भारतात परत पाठवण्याच्या प्रक्रियेबाबत काय प्रगती झाली अशी विचारणा पंतप्रधान मोदी यांनी केली.

सप्टेंबर २०२३ मध्ये होणाऱ्या जी-२० परिषदेला उपस्थित राहण्याचे आमंत्रण पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान सुनक यांना दिले. जी-२० समूहाच्या भारताकडील अध्यक्षतेच्या काळात झालेल्या प्रगतीची पंतप्रधान सुनक यांनी प्रशंसा केली आणि भारताचे विविध उपक्रम आणि त्यांच्या यशस्वितेला युकेचा पूर्ण पाठींबा असल्याचा पुनरुच्चार सुनक यांनी केला. बैसाखीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान सुनक आणि युकेस्थित भारतीय समुदायाला शुभेच्छा दिल्या. दोन्ही नेत्यांनी आगामी काळात परस्परांच्या सतत संपर्कात राहाण्यास मान्यता दिली.

Exit mobile version