माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नावाजलेली कंपनी इंटेल भारतात सेमीकंडक्टर उत्पादन युनिट स्थापन करणार आहे. मोदी सरकारने सेमीकंडक्टरचे संशोधन, नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारताला सेमीकंडक्टर उत्पादनाचे केंद्र तयार करण्याचा निर्णय घेतला होता. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर इंटेल कंपनीने हा निर्णय घेतला आहे. माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्वीट करून इंटेलचे भारतात स्वागत आहे.
Intel – welcome to India. https://t.co/1Wy90HfAjy
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) December 28, 2021
मोदी सरकारने भारताला हाय-टेक उत्पादन क्षेत्रात जागतिक केंद्र बनवण्यासाठी देशातील सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टमसाठी ₹७६,००० कोटींच्या धोरणाला मान्यता दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर इंटेलने केलेली घोषणा अतिशय महत्त्वाची आहे.
इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात सेमीकंडक्टर महत्वाची आणि निर्णायक भूमिका बजावते. जगभरात सेमीकंडक्टरला मोठी मागणी आहे. सेमीकंडक्टर उत्पादनात भारत प्रमुख देश होईल यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
सरकारने सिलिकॉन सेमीकंडक्टर फॅब, डिस्प्ले फॅब, कंपाऊंड सेमीकंडक्टर, सिलिकॉन फोटोनिक्स, सेन्सर्स फॅब, सेमीकंडक्टर पॅकेजिंग आणि सेमीकंडक्टर डिझाइनमध्ये गुंतलेल्या कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी धोरण तयार केले आहे. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्सची स्थापन करणाऱ्या कंपन्यांना प्रकल्प खर्चाच्या ५० टक्क्यांपर्यंत आर्थिक सहाय्य देणार आहे.
हे ही वाचा:
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बारगळणार
कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी आणखी दोन लसींना मान्यता
दिव्यांग रिक्षाचालकाला आनंद महिंद्रा यांनी दिली ‘ही’ ऑफर
चीन आणि तैवानमध्ये मोठ्या प्रमाणावर सेमीकंडक्टरचे उत्पादन होते. भारत चीनला शह देण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी सेमीकंडक्टरचा तुटवडाही निर्माण झाला होता. सेमीकंडक्टरच्या बाबतीत चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठीची चर्चाही तेव्हा सुरू होती.