मुंबई महानगर प्रदेशासाठी अतिशय महत्त्वाच्या ठाणे- भिवंडी- कल्याण (मेट्रो ५) मेट्रो मार्गिकेचे काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) काढलेल्या एका पत्रकात म्हटले आहे.
या मार्गाची एकूण लांबी सुमारे २४.९० किमी असणार आहे. या लांबीपैकी १२.७ किमी लांबीचा कापूरबावडी ते भिवंडी हा टप्पा कापूरबावडी, बाळकुम नाका, कशेळी, कल्हेर, पूर्णा, अंजूर फाटा, धामणकर नाका आणि भिवंडी यांना जोडणारा आहे. या मार्गावरील पहिल्या पिलरची उभारणी ठाण्याच्या बाळकुम नाक्याजवळ २२ जानेवारी रोजी करण्यात आली असे एमएमआरडीएतील एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले.
या कामासाठी केंद्राकडून बाळकुम नाक्यावरील १,९७१.७१ स्क्वे.मी. जंगल दुसरीकडे हलविण्याबाबत राज्य सरकारने राज्याला परवानगी दिली आहे. त्याबरोबरच कशेळी, भिवंडी येथील ३७७.८६ स्क्वे.मी जंगल या प्रकल्पाचे २४ पिलर उभारण्यासाठी हलवण्यात येणार आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातील ३३७ किमी लांबीचे मेट्रो मार्गांचे जाळे २०२६ पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न असणार आहे. यापैकी दहिसर ते डी एन नगर (मेट्रो २अ) आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व (मेट्रो ७) या मार्गिका या वर्षाच्या मे महिन्यपर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन्ही मार्गांसाठी एकत्रित पणे वापरल्या जाणाऱ्या चारकोप डेपोचे आणि २अ मार्गिकेच्या डब्यांचे उद्घाटन करणार आहेत.