१९८४पासून बेपत्ता असलेल्या जवानाचे पार्थिव ३८ वर्षांनी सापडले

पत्नी शांती देवी यांना दिली माहिती

१९८४पासून बेपत्ता असलेल्या जवानाचे पार्थिव ३८ वर्षांनी सापडले

सियाचेनमध्ये १९८४पासून बेपत्ता असलेल्या एका जवानाच्या मृतदेहाचे अवशेष आता तब्बल ३८ वर्षांनंतर सापडले आहेत. जगातली सर्वात उंच अशा युद्धभूमीवर हा जवान तेव्हा तैनात होता. मात्र बर्फाच्या वादळात तो बेपत्ता झाला होता. लान्स नायक चंद्रशेखर असे त्या जवानाचे नाव होते.

१९ कुमाऊँ बटालियनच्या असलेल्या चंद्रशेखर यांनी १९८४मध्ये सियाचेन येथे झालेल्या ऑपरेशन मेघदूतमध्ये भाग घेतला होता. मात्र त्यात ते बेपत्ता झाले. त्यांच्या पार्थिवाचे काही अंश तेथे अनेक वर्षे पडीक अवस्थेत असलेल्या बंकरमध्ये सापडले. सेनादलाच्या नॉर्दर्न कमांडने केलेल्या ट्विटमध्ये याविषयी म्हटले की, भारतीय लष्कराचे जवान गस्त घालत असताना त्यांना लान्स नायक चंद्र शेखर यांच्या पार्थिवाचे अवशेष सापडले. २९ मे १९८४पासून ते बेपत्ता होते.

हे ही वाचा:

मेटेंचा लढा वाया जाऊ देणार नाही

स्वातंत्र्यलढ्यातील रोमहर्षक प्रसंगांच्या अभिवाचनातून साजरा झाला ‘अमृतमहोत्सव’

भ्रष्टाचार, घराणेशाहीवर राहुल गांधींची बोलती बंद

कशा विसरू आम्ही फाळणीच्या जखमा ?

 

त्यांच्या शरीराच्या अवशेषांसोबत जवानाची ओळख पटविण्यासाठी असलेल्या धातूच्या गोलाकार बिल्ल्यावरील क्रमांकावरून ही ओळख पटविण्यात आली.

१४ ऑगस्टला चंद्रशेखर यांच्या पत्नी शांती देवी यांना त्यांच्या पतीच्या पार्थिवाचे अंश सापडल्याची माहिती देण्यात आली. १९७१ मध्ये चंद्रशेखर हे लष्करात भर्ती झाले. त्यानंतर मेघदूत मोहिमेत त्यांना ५९६५ पॉइंट हे शिखर काबीज करण्याचे आव्हान होते. पाकिस्तानने काही शिखरांवर कब्जा मिळविला होता. पण या मोहिमेदरम्यान त्यांच्यावर काळाने घाला घातला. हिमवादळात १८ जवान गाडले गेले. १४ जवानांचे पार्थिव सापडले पण बाकीच्यांचे देह मात्र मिळू शकले नाहीत. आता चंद्रशेखर यांचे पार्थिव सापडले आहे.

Exit mobile version