एडनच्या आखातातून जाणाऱ्या व्यापारी जहाजावर येमेचन्या हौथी बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात जहाजावरील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर, अन्य कर्मचाऱ्यांना हे जहाज सोडण्यास भाग पाडण्यात आले. इस्रायलने हमासवर पुकारलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हौथी गटाने केलेला हा पहिला हल्ला आहे, ज्यात जीवितहानी झाली आहे.
बार्बाडोसचा ध्वज असणाऱ्या या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यामुळे आशिया तसेच मध्यपूर्वेकडील देशातून युरोपला जाणारी जागतिक व्यापारी जलवाहतूक विस्कळीत झाली आहे. इराणसमर्थित हौथी बंडखोर गटाने नोव्हेंबरपासूनच या हल्ल्याला सुरुवात केली आहे. जानेवारीपासून अमेरिकेनेही या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी हवाईहल्ले केले असले तरी त्यामुळे या बंडखोरांचे हल्ले थांबलेले नाहीत.
दरम्यान इराणने वर्षभरापूर्वी अमेरिकेची ऊर्जा कंपनी शेवरॉन कॉर्पोरेशनला जाणारे पाच कोटी डॉलर किमतीचे कुवेती क्रूड तेल वाहून नेणारे मालवाहू जहाज जप्त केले होते. त्यातील माल आता जप्त केला जाईल, अशी घोषणा बुधवारी इराणने केली.
हौथी गटाने नुकत्याच केलेल्या क्षेपणास्त्रहल्ल्यात जहाजावरील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर, अन्य सहाजण जखमी झाले. लेबिरेयनच्या मालकीच्या या जहाजाचे नेमके किती नुकसान झाले, हे समजू शकले नसले तरी या हल्ल्यातून वाचलेल्या कर्मचाऱ्यांनी हे जहाज सोडले असून ते जीवरक्षक बोटीतून रवाना झाले आहेत. अमेरिकेची युद्धनौका आणि भारतीय नौदल तेथे तैनात असून ते त्यांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. ‘हे हल्ले तेव्हाच थांबतील, जेव्हा गाझामधील पॅलेस्टिनी नागरिकांवरील हल्ले थांबतील,’ असे हौथी लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल याह्या सारी यांनी जाहीर केले आहे.
हे ही वाचा :
‘राजकीयदृष्ट्या पक्षपाती निर्णय कधीच दिला नाही’
ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी अरविंद केजरीवालांना न्यायालयाकडून समन्स
पंतप्रधानांची दक्षिण मोहीम; भाजपला ३० जागा मिळण्याची शक्यता
इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून हौथी बंडखोरांच्या गटाने सातत्याने लाल समुद्र आणि परिसरातील जहाजांवर हल्ले केले आहेत, मात्र आतापर्यंत त्यांनी जहाजावरील कोणत्याही कर्मचाऱ्याला इजा केली नव्हती. मात्र बुधवारी पहिल्यांदाच त्यांच्या हल्ल्यात दोन कर्मचारी मारले गेले.