म्यानमारमध्ये लष्कराने बंड करून एका वर्षाची आणीबाणी जाहीर केली. म्यानमारच्या लोकनियुक्त, अघोषित नेत्री आन सान स्यु की आणि देशाचे राष्ट्राध्यक्ष विन मिंट यांना एक वर्षासाठी स्थानबद्धतेत ठेवण्यात आले आहे.
अनेक आठवड्यांच्या सरकार आणि लष्करातील तणावानंतर ही घटना समोर आली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये म्यानमारमध्ये दुसरी सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीत आन सान स्यु की यांना सर्वाधिक जागा मिळाल्या आणि त्यांचे सरकार पुन्हा स्थापन झाले. या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप म्यानमारच्या लष्कराने केला आहे.
नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी (एनडीएल) या आन सांग स्युकी यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी आन सान स्यु की आणि राष्ट्राध्यक्षांना लष्कराने ताब्यात घेतल्याची माहिती दिली. “सध्या घडत असलेल्या घडामोडींच्या आधारावर हे लष्करी बंड असल्याचे वाटत आहे.” अशी माहिती पक्षाच्या प्रवक्त्यांनी दिली.
शीर्षस्थ नेत्यांबरोबरच अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनादेखील ताब्यात घेण्यात आले आहे. तर नव्याने निवडण्यात आलेल्या खासदारांबाबत अजूनही साशंकता आहे. म्यानमारमध्ये रेडिओसेवा आणि दूरध्वनीसेवा देखील बंद झाल्याची माहिती मिळाली आहे.
म्यानमारमध्ये २०१५ मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यापूर्वी ५० वर्ष म्यानमार मध्ये लष्करी हुकूमशाहीच होती.