पहिला संपूर्ण भारतीय बनावटीचे मेट्रो डबे लवकरच भारत अर्थ मुव्हर लिमिटेडच्या (बीईएमएल) कारखान्यातून मुंबईत दाखल होतील. त्यानंतर मेट्रो मार्ग २अ (दहिसर ते डी एन नगर) आणि मेट्रो मार्ग ७ (दहिसर ते अंधेरी- पश्चिम द्रुतगती महामार्गावरून) मे महिन्यापासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. बंगळूरू येथील बीईएमएलच्या कारखान्यातून २२ जानेवारी रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) दाखल होण्यासाठी डबे रवाना होतील.
राज्याचे शहर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच बीईएमएलच्या कारखान्याचा दौरा केला आणि मुंबई मेट्रोच्या डब्यांच्या बांधकामाची पाहणी केली.
शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जानेवारी रोजी मेट्रोचे डबे बीईएमएलच्या कारखान्यातून रवाना होतील. सात वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मुंबईकर मेट्रोचे स्वागत करू शकतील. याशिवाय मुंबईकरांना मेट्रोचे प्रथम दर्शन घेण्याची देखील उत्सुकता असेलच. मुंबईत आल्यानंतर मेट्रोच्या विविध चाचण्या केल्या जातील. त्यानंतर मे २०२१ पासून मेट्रोची सेवा सुरू करण्याचा आमचा मानस आहे.
एमएमआरडीए तर्फे करण्यात येणारे मेट्रो मार्गिका आणि स्थानकांचे बांधकाम शेवटच्या टप्प्यात आहे. त्याशिवाय मेट्रोच्या गाड्यांच्या बांधणीचे काम बीईएमएलकडून करण्यात येत आहे.
मेट्रोचे डबे चारकोप कारशेड मध्ये २७ जानेवारी रोजी दाखल होतील. त्यानंतर, मेट्रोच्या विविध चाचण्यांना प्रारंभ होईल.