मेस्सीच्या अर्जेंटिनाला वर्ल्डकप; जिंकले ३ अब्ज ४७ कोटी रुपयांचे इनाम

अर्जेंटिनाने फ्रान्सवर ७-५ मात करत नोंदविला वर्ल्डकपमध्ये ऐतिहासिक विजय

मेस्सीच्या अर्जेंटिनाला वर्ल्डकप; जिंकले ३ अब्ज ४७ कोटी रुपयांचे इनाम

अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यातील कतार फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी लुसेल स्टेडियममध्ये ओसंडून वाहणाऱ्या प्रेक्षकांपैकी प्रत्येकजण जणू काही मैदानातच उतरला होता. सगळा माहोल एकजीव झाला होता. आपण आपल्या खेळाडूंसह मैदानात धावतो आहोत, असाच भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता. या दोन संघांनी अंतिम फेरीत पोहोचल्यापासून कोण जिंकणार यावर पैजा लागत होत्या.

अर्जेंटिनाच्या लिओनल मेस्सीसाठी हा जीवनमरणाचाच प्रश्न होता जणू. त्याच्या कारकीर्दीतला अखेरचा वर्ल्डकप. काय वाढून ठेवलंय कुणालाही ठाऊक नव्हतं. पण दिवस त्याचाच होता. अंतिम सामन्यात दोन गोल तेही पेनल्टीवर आणि एक गोल जादा वेळएत मारून मेस्सीने आपल्या संघाला एक ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिले. अर्जेंटिनाचे हे तिसरे वर्ल्डकप जेतेपद. अर्जेंटिनाने या विजेतेपदासह ३ अब्ज ४७ लाखांचे इनाम जिंकले तर उपविजेत्या फ्रान्सला २ अब्ज ४८ लाखांचे इनाम मिळाले. निर्धारित ९० मिनिटांच्या खेळात २-२ अशी बरोबरी आणि जादा वेळेत ३-३ अशी बरोबरी झाल्यानंतर सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये खेळविला गेला. ३-३ अशा बरोबरीनंतरही कोंडी न फुटल्याने शेवटी पेनल्टी शूटआऊटवर निर्णय घेण्याचे ठऱले. त्यात अर्जेंटिनाने ४ तर फ्रान्सने २ गोल मारल्यामुळे अर्जेंटिनाच्या विजेतेपदावर एक सोनेरी शिक्कामोर्तब झाले.

पहिल्या सत्रात लागोपाठ दोन गोल अर्जेंटिनाने नोंदविले आणि त्यावेळी अर्जेंटिनाच वर्ल्डकप जिंकणार आणि तेही सहज असे वाटून गेले. पण मार्ग खडतर होता. मेस्सीने पेनल्टीवर पहिला गोल आणि नंतर डी मारिआने दुसरा मैदानी गोल करत अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. पण फ्रान्सच्या एमबापेने दुसऱ्या सत्रात दोन गोल करत फ्रान्सला २-२ अशी बरोबरी गाठून दिली तेव्हा विजेतेपदाचा मार्ग कुणालाही सोपा नाही हे स्पष्ट झाले.

जादा वेळेत पहिल्या १५ मिनिटांच्या खेळात मेस्सीने आणखी एक गोल मारत आपल्या संघाला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. तेव्हाही अर्जेंटिनाला विजयाची संधी निश्चित असेच वाटून गेले. पण पुन्हा नशिबाने थट्टा मांडली. एमबापेने पेनल्टीवर गोल करत वर्ल्डकपमधील हॅट्ट्रिक नोंदविली. जेफ हर्स्ट या इंग्लंडच्या खेळाडूने अंतिम फेरीत १९६६मध्ये अशी हॅट्ट्रिक नोंदविली होती त्याची पुनरावृत्ती एमबापेने केली. त्यामुळे सामना ३-३ अशा बरोबरीत गेल्यानंतर. शेवटी सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटवर लागणार हे स्पष्ट झाले.

हे ही वाचा:

चुकीच्या विधानामुळे किरण रिजिजूनी राहुल गांधींना फटकारले

६० दिवस २२ पोलिस घेत आहेत मुलीचा शोध

हिजाबला विरोध करणाऱ्या ऑस्कर विजेत्या अभिनेत्रीला अटक

मुंबईत कार आणि एसयूव्हीच्या नोंदणीत ३६ टक्क्यांनी वाढ

यात अर्जेंटिनाचा गोलरक्षक मार्टिनेझने जबरदस्त भूमिका बजावली त्याने फ्रान्सचे दोन पेनल्टी अडवले आणि एकप्रकारे अर्जेंटिनाचा विजयाचा मार्ग मोकळा केला. अर्जेंटिनाचे पहिले चारही प्रयत्न यशस्वी ठरले. एमबापेने हॅट्ट्रिक मारूनही त्याचे स्वप्न भंगले. गोल्डन बूट हा स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीसाठीचा पुरस्कार एमबापेला मिळाला खरा पण त्याच्या चेहऱ्यावर त्याचा आनंद नव्हता. स्पर्धेत त्याने ८ गोल लगावले. मेस्सीला त्याने या शर्यतीत पराभूत केले पण अंतिम फेरीत विजेतेपदात मात्र तो ती कामगिरी करू शकला नाही.  अर्जेंटिनाचा गोलरक्षक मार्टिनेझला गोल्डन ग्लव्ह हा सर्वोत्तम गोलरक्षकाचा पुरस्कार मिळाला तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा किताब मेस्सीने पटकाविला.

Exit mobile version