जगातील क्रमांक एकचा टेनिसपटू सर्बियाचा नोवाक जोकोविच याचे ऐतिहासिक स्वप्न भंगले आहे. यु.एस ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जोकोविच पराभूत झाला आहे. रशियाचा डॅनियल मेडवेडेव याने तीन सरळ सेटमध्ये जोकोविचला पराभूत केले आहे. या विजयासह मेडवेडेवने या वर्षातील त्याचे पहिले वहीले ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावले आहे.
रविवारी भारतीय वेळेनुसार रात्री उशिरा यू.एस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेचा अंतिम सामना सुरू झाला. हा सामना थरारक होणार असे सर्वांनाच वाटत होते. कारण एकीकडे नोवाक जोकोविच होता. जो आंतरराष्ट्रीय क्रमवारीत क्रमांक एकचा टेनिसपटू आहे. तर त्याच्या विरुद्ध क्रमांक दोन वरील मेडवेडेव हा उभा ठाकला होता. पण हा सामना संपला तेव्हा सर्वांचाच एक प्रकारे अपेक्षाभंग झाला होता.
तब्बल २ तास १५ मिनिटे चाललेल्या या सामन्यात मेडवेडेव याने जोकोविचचा अतिशय सहजरित्या पराभव केला. तीन सरळ सेट्समध्ये हा सामना निकालात निघाला ६-४, ६-४, ६-४ या फरकाने मेडवेडेवने सामना जिंकत ग्रँड स्लॅम चषकावर आपले नाव कोरले.
हे ही वाचा:
शिवसेना उत्तर प्रदेश निवडणूकीच्या रिंगणात! यावेळी तरी डिपाॅझिट वाचणार?
ठाकरे सरकार बेजबाबदार आणि असंवेदनशील! महिला आयोगाचे ताशेरे
पैशाचे आमिष दाखवून धर्मांतर करणारा ख्रिस्ती भोंदू अटकेत
भूपेंद्र पटेल होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री! मोदी-शहांचे धक्कातंत्र कायम
इतिहास रचण्यापासून जोकोविच राहिला दूर
जोकोविच या सामन्यात इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर होता. जोकोविचने या वर्षी चार पैकी तीन मुख्य ग्रँडस्लॅम स्पर्धा आपल्या नावे केल्या आहेत. यामध्ये फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलियन ओपन या स्पर्धांचा समावेश आहे. या सोबतच यू.एस ओपन ही चौथी मानाची स्पर्धा मानली जाते. जर यु.एस ओपनचा अंतिम सामना जोकोविच जिंकला असता तर तो कॅलेंडर स्लॅमचा मानकरी ठरला असता. हा विक्रम रचताना त्याने रॉड लेवर या जगविख्यात टेनिसपटूच्या विक्रमाशी बरोबरी केली असती. लेवर याने १९६९ आणि १९६२ या दोन वर्षात हा विक्रम केला होता.