वंदे ‘आत्मनिर्भर’ भारत

वंदे ‘आत्मनिर्भर’ भारत

हैदराबाद स्थित ‘मेधा सर्वो ड्रायव्हर्स प्रा.लि.’ या कंपनीला भारतीय रेल्वे कडून ‘वंदे भारत’ अथवा ‘ट्रेन-१८’ करिता कंत्राट मिळाले आहे. यासाठी भारतीय रेल्वेने ₹२ हजार २११ कोटी मोजले आहेत. ‘मेक इन इंडिया’ योजनेला गती देण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतल्याचे कळले आहे.

‘मेधा’ ही कंपनी पुढील पाच वर्षात ४४ गाड्यांची निर्मीती करणार आहे. या कंत्राटात, गाड्यांची निर्मीती आणि त्यांच्या देखभालीचा देखील समावेश करण्यात आला आहे.

या गाडीसाठी तीन वेळा निवीदा काढण्यात आल्या मात्र प्रत्येक वेळेला तांत्रिक कारणांमुळे त्या रद्द कराव्या लागल्या. ही नवी निवीदा बनविताना, उद्योगांशी दीर्घ चर्चा करून आवश्यक त्या सुधारणा करून मग तयार करण्यात आली होती. यावेळी प्रथमच निवीदेच्या एकूण रकमेच्या ७५ टक्के रक्कम ही देशांतर्गत उत्पादकांसाठी असली पाहिजे अशी अट घालण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेमुळे ही तरतूद करण्यात आली होती.

ही गाडीची बांधणी रेल्वेच्या तीन प्रवासी डबे उत्पादक कारखान्यांत केली जाणार आहे. वंदे भारतच्या ४४ गाड्यांपैकी २४ गाड्यांची निर्मीती चेन्नईच्या ‘इंटिग्रेटेड रेल कोच फॅक्टरी (आयसीएफ)’ मध्ये होईल, तर १० गाड्यांची निर्मीती ‘रेल कोच फॅक्टरी, कपूरथळा’ येथे होईल. यासोबतच १० गाड्यांची निर्मीती ‘मॉडर्न कोच फॅक्टरी, रायबरेली’ येथे होईल.

वंदे भारत ही भारतीय रेल्वेवरची अर्ध-जलदगती गाडी आहे. ही संपूर्ण स्वदेशी बनावटीची इंजिन विरहीत गाडी आहे. या गाडीची निर्मीती चेन्नईच्या आयसीएफमध्ये करण्यात आली होती. सध्या ही गाडी वाराणसी ते नवी दिल्ली या मार्गावर सेवेत आहेत.

Exit mobile version