परराष्ट्र मंत्रालयाचा चीनवर तीव्र आक्षेप

परराष्ट्र मंत्रालयाचा चीनवर तीव्र आक्षेप

परराष्ट्र मंत्रालयाकडून चीनने अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागात नव्याने बांधकाम केल्याच्या बातमीला दुजोरा देण्यात आला आहे. भारत सीमेवरील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेऊन आहे असे मंत्रालयाने म्हटले आहे.

मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तात, ‘आम्हाला सीमावर्ती भागात चीन रस्ते बांधकाम करत असल्याची खबर मिळाली आहे. चीन मागील अनेक वर्षे सीमाभागात पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे करत आहे.’ असे देखील म्हटले आहे.

माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार उपग्रहाद्वारे घेतल्या गेलेल्या छायाचित्रांत, चीनने या भागात एक सबंध नवीन गाव वसवल्याचे दिसत आहे.

मंत्रालयाने याला उत्तर देताना सांगितले, की भारत त्याच्या सीमा सुरक्षा आणि सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना अमलात आणेल. त्याचबरोबर मंत्रालयाचे अशा प्रकारच्या सगळ्या बांधकामांकडे बारीक लक्ष आहे. पुढे मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, अरुणाचल प्रदेश मधील आपल्या नागरिकांच्या सुविधेसाठी सीमावर्ती भागात पायाभूत सोयी सुविधांच्या निर्मीतीसाठी सरकार कटिबद्ध आहे.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतानेही आपल्या सीमा सुरक्षेत वाढ केली आहे. त्याचबरोबर या भागातील विकासकामांचा वेग देखील वाढवला आहे. यात रस्ते, पूल इत्यादींचा समावेश आहे. त्यामुळे, स्थानिक लोकांना अत्यावश्यक असलेली सोयही झाली आहे.

सैन्य आणि कूटनैतीक चर्चा असफल ठरल्यामुळे भारत आणि चीन दिनांक ५ मे पासून पूर्व लडाख भागात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या पार्श्वभूमीवर या घडामोडींना वेगळेच महत्त्व प्राप्त आहे.

Exit mobile version