ठरावाद्वारे केल्या मागण्या; शुक्रवारी होणार बैठक
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कारभारावर अंकुश ठेवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत एमसीए अपेक्स कौन्सिल सदस्यांनीच आता एल्गार पुकारला आहे. अपेक्स कौन्सिलची तातडीची बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे. ही मागणी करतानाच एमसीएच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी काही ठरावही मांडले आहेत. ज्या ठरावांवर या बैठकीत चर्चा व्हायला हवी अशी त्यांची अपेक्षा आहे. यासंदर्भात एमसीएचे अध्यक्ष विजय पाटील यांनी शुक्रवार २० ऑगस्टला विशेष बैठकीचे आयोजन करून सर्व अपेक्स कौन्सिल सदस्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची तयारी दर्शविली आहे.
एमसीएचे खजिनदार जगदीश आचरेकर, अपेक्स कौन्सिलचे सदस्य उन्मेष खानविलकर, अजिंक्य नाईक, गौरव पय्याडे, अभय हडप, कौशिक गोडबोले, नदीम मेमन आदिंनी ही मागणी केली असून त्यांनी ८ ठराव मांडले आहेत.
हे ठराव असे-
१) कंत्राटे देताना अपेक्स कौन्सिल बैठकीबाहेर निर्णय घेतले गेले तर ते निर्णय रद्द करण्यात यावेत. उद्दीष्ट : कंत्राट देण्याचा निर्णय अपेक्स कौन्सिलमध्येच व्हायला हवा. तसेच निविदा मागविण्यासाठी जी प्रमाणित पद्धत आहे, त्यानुसारच निविदा मागविण्यात यायला हव्यात आणि कंत्राट देण्यासाठीचे करार खजिनदाराने तयार केले पाहिजे. कायदा समितीच्या देखरेखीखाली आणि अपेक्स कौन्सिलच्या मंजुरीनेच ते व्हायला हवे.
२) संघप्रशिक्षक, निवड समिती, सपोर्ट स्टाफ या सगळ्यांचे करार खजिनदारांकडून तयार केले गेले पाहिजेत. त्यात सगळ्या अटी-शर्तींचा, कर्तव्य, हक्क, वेतनाचा गोषवारा, कालमर्यादा आदि गोष्टींचा समावेश केलेला हवा. कायदेशीर बाबींच्या उपसमितीकडून तपासून आणि अपेक्स कौन्सिलच्या मंजुरीनंतरच ते करार तयार केले गेले पाहिजेत.
३) प्रत्येक महिन्याला करता येणाऱ्या पाच लाख इतक्या खर्चाबाबत अपेक्स कौन्सिलकडून मान्यता असणे गरजेचे आहे. जोपर्यंत अपेक्स कौन्सिलची मंजुरी मिळणार नाही तोपर्यंत ती रक्कम दिली जाऊ नये.
हे ही वाचा:
विमानांच्या संरक्षणासाठी डीआरडीओचे नवे तंत्रज्ञान
गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी चाकरमान्यांची रीघ
पाकिस्तानला तालिबान प्रेमाची उचकी
४) १९ वर्षांखालील मुलांची सफाळे येथे होत असलेली शिबिरे तात्काळ रद्द करण्यात यावीत आणि ती मुंबईतील बीकेसीमधील शरद पवार इनडोअर अकादमीत आयोजित करावीत. ही अकादमी याच कारणासाठी बनविण्यात आल्यामुळे आणि त्यासंदर्भातील सर्व सुविधा तिथे असल्यामुळे अशा शिबिरांचे आयोजन इनडोअर अकादमीत केले जावे. सफाळे येथे या मुलांचे शिबीर आयोजित करण्यामागील कारण काय, हे कळावे. या इनडोअर अकादमीबाहेर अशी शिबिरे आयोजित केल्यामुळे आपण तयार केलेल्या सुविधा वाया जात आहेत, निष्कारण जादा खर्च करावा लागतो आहे, इनडोअर अकादमीतील कर्मचाऱ्यांना आपण वेतन देत आहोत, ते कशासाठी? मुंबईतील या इनडोअर अकादमीची तुलना अन्य कोणत्याही सुविधेशी करता येणार नाही. शिवाय, ही इनडोअर अकादमीची जागा जर वापरली गेली नाही तर ती जागा रिकामी करण्याविषयी एमएमआरडीएने जी नोटीस बजावली आहे, त्याला अधिक बळ मिळेल.
५) सचिवांकडून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या घटनेचे उल्लंघन होत आहे.
६) अपेक्स कौन्सिलच्या बैठकीत योग्य इतिवृत्त सादर केले जावे.
७) अपेक्स कौन्सिलचे सदस्य हे विविध समित्यांचे प्रमुख असावेत.
८) सध्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे अधिकार कार्यकारी सचिव सी.एस. नाईक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. पण संघटनेत नियमित कामकाजासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी नेमणे आवश्यक आहे. घटनेतही ते नमूद केले आहे.