ग्लेन मॅक्सवेलने केवळ ४० चेंडूंत केलेले वर्ल्डकपमधील वेगवान शतक आणि वॉर्नरच्या ९३ चेंडूंतील १०४ धावा या जोरावर ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप स्पर्धेतील आपल्या एका मोठ्या विजयाची नोंद केली. त्यांनी नेदरलँड्सवर ३०९ धावांनी दणदणीत विजय मिळविला. या विजयामुळे नेदरलँड्सचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात या दोन शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने ८ बाद ३९९ धावांचा डोंगर उभारला. पण नेदरलँड्सचा संघ अवघ्या ९० धावांतच गारद झाला. याच स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामने शतकाचा विक्रम केला होता पण अवघ्या २० दिवसांत मॅक्सवेलने तो मागे टाकला.
अवघ्या २१ षटकांतच हा सामना ऑस्ट्रेलियाने खिशात घातला. मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी १ बळी घेतला तर फिरकी गोलंदाज ऍडम झम्पाने ८ धावांत ४ बळी घेतले. या स्पर्धेत खराब सुरुवात झालेल्या ऑस्ट्रेलियाचे आक्रमक रूप या सामन्याच्या निमित्ताने पुन्हा पाहायला मिळाले. आता या स्पर्धेचा विजेतेपदाचा चषक जिंकण्याची इच्छा ऑस्ट्रेलियन संघाच्या मनात पुन्हा जागृत झाली आहे.
वॉर्नरने शतक झळकाविणे यात फारसे आश्चर्य नव्हते पण मॅक्सवेलने शतक झळकावले ते मात्र आश्चर्य होते. मॅक्सवेल हा फटकेबाजीसाठी प्रसिद्ध मानला जातो मात्र दिल्लीतील स्टेडियमवर त्याचा खेळ विशेषच होता. त्याने ४४ चेंडूंत १०६ धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने ७१ तर मार्नस लाबुशानने ६२ धावा केल्या. मॅक्सवेलच्या या शतकी खेळीत ८ षटकार आणि ९ चौकारांचा समावेश होता. नेदरलँड्सच्या लोगान वॅन बीकने ४ बळी घेतले.
हे ही वाचा:
१३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना ‘पी एम किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेचा लाभ मिळणार
निलेश राणेंच्या राजकीय निवृत्तीवर मंत्री रवींद्र चव्हाणांनी घेतली भेट!
बेस्ट गरबाचे पारितोषिक जिंकले, मात्र आयोजकांनी केली पित्याची हत्या
पॅलेस्टिनींना मानवतावादी मदत करत राहणार
या धावसंख्येला उत्तर देताना नेदरलँडसचा सलामीवीर विक्रमजीत सिंग याने केलेली २५ धावांची खेळी केली. पण ती त्यांची सर्वोत्तम खेळी होती. पण अवघ्या २१ षटकांतच नेदरलँड्सचा खेळ खल्लास झाला. ग्लेन मॅक्सवेल हाच या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला.
या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ चौथ्या स्थानावर पोहोचला आहे आणि त्यांच्या खात्यात ६ गुण आहेत. भारत १० गुणांसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. तर दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड हे प्रत्येकी ८ गुणांसह दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे ४ गुणांसह चौथ्या व पाचव्या क्रमांकावर आहेत.