राष्ट्रीय बालहक्क आयोगाच्या तपासात आसाम आणि मणिपूरमधील सहा स्वयंसेवी संस्थांच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता आढळली आहे. या संस्था ‘ऑल इंडिया युनाइटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चा अध्यक्ष बद्रुद्दीन अजमलच्या ‘मार्काझुल मारिफ’ या संस्थेशी संबंधित आहेत. यापैकी एका संस्थेला तुर्कस्तान मधील ‘आय एन एच’ या अल कायदाशी संबंधित संस्थेकडून देणगी मिळाल्याचेही समोर आले आहे.
बद्रुद्दीन अजमलच्या धुब्री,गोलपारा,नागाव आणि थाऊबल येथील आश्रमात १०८० मुले असल्याचा दावा संस्थेच्या वेब साईटवर केला जातो, पण प्रत्यक्षात बालहक्क आयोगाला मात्र ७७८ मुलेच आढळून आली. त्यामुळे ३०० मुले कुठे बेपत्ता झाली? याचा शोध घेणे महत्वाचे आहे. ‘लीगल राईट्स ऑबझर्व्हेटरी’ या स्वयंसेवी संस्थेने मार्काझुल विरोधात बालहक्क आयोगात तक्रार केली होती.
लहान मुलांना बांबूने मारहाण.
बालहक्क आयोगाच्या तपासात अनेक बाबी समोर आल्या आहेत. आश्रमांमध्ये मुलींच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नाही, अस्वच्छ प्रसाधनगृहे, CCTV यंत्रणेचा अभाव आणि शिस्तीच्या नावाखाली मुलांना अमानवीपणे बांबूच्या काठयांनी मारहाण होत असल्याचेही समोर आले आहे.
बद्रुद्दीन अजमल हे नाव कायमच वादाच्या भोवऱ्यात राहिले असून काहीच दिवसापूर्वी त्याच्या अजमल फाउंडेशन या संस्थेविरोधात एफआयआर दाखल झाली आहे.