मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया या कार्यक्रमातील सेलिब्रिटी शेफ आणि परीक्षक जॉक झोनफ्रिलो यांचे निधन झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. ३० एप्रिल रोजी वयाच्या ४६ व्या वर्षी झोनफ्रिलो यांचे निधन झाले. झोनफ्रिलो यांनी मास्टरशेफ ऑस्ट्रेलियामध्ये बर्याच सीझनसाठी परीक्षक म्हणून काम केले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी निधनाची बातमी दिली आहे.
भारतीय शेफ आणि माजी मास्टरशेफ इंडियामधील परीक्षक कुणाल कपूर यांनी सोशल मीडियावर जॉक झोनफ्रिलो यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कुणाल यांनी जॉक यांच्यासोबत काम केले होते.
‘जॉक झोनफ्रिलो यांच्या निधनाबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करण्यासाठी जड अंतःकरणाने भावना व्यक्त करत आहे. त्यांच्या अचानक जाण्याने आम्हा सर्वांना धक्का बसला आहे. एक सहकारी शेफ म्हणून, मला जॉकसोबत काम करण्याचा आणि त्यांना वैयक्तिकरित्या जाणून घेण्याची संधी मिळाली. जॉक हे एक दयाळू असे व्यक्तिमत्व होते. ते सतत आपले ज्ञान आणि अनुभव इतरांना सांगत असत. त्यांची प्रतिभा, सर्जनशीलता आणि काम करण्याचा उत्साह स्वयंपाकघरात नक्कीच कमी जाणवेल. जॉक तुमची खूप आठवण येईल.’ अशा भावना कुणाल यांनी व्यक्त केल्या आहेत.
हे ही वाचा:
महात्मा गांधींचे नातू अरुण गांधी यांचे निधन
भिवंडीतून गायब झालेले बाळ सापडले झारखंडमध्ये
‘वज्रमूठ सभा म्हणजे निराश लोकांचा कार्यक्रम’
केरळ स्टोरीवर सरकारकडून बंदीची मागणी वितरक मात्र पाठीशी
या आठवड्यात ऑस्ट्रेलियामध्ये मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाचा नवा सीझन सुरू होणार होता. मात्र, जॉक यांच्या निधनाचे वृत्त समजताच या आठवड्यात नवा भाग प्रसारित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.