पाकिस्तानचे सध्या वाईट दिवस सुरु आहेत. रोज काही ना काही नवीन संकट उभे राहत आहे. आता सोमवारी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांताची राजधानी पेशावरमधील पोलीस लाईन भागातील मशिदीजवळ बॉम्बस्फोट झाला. हा स्फोट खूप जोरदार होता.यामध्ये अनेकजण जखमी झाल्याचा दावा केला जात आहे. हा स्फोट नसून आत्मघातकी हल्ला झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार,हा स्फोट खूप शक्तिशाली असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण त्याचा कित्येक मैल दूरपर्यंत ऐकू आला. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, परंतु या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुहरच्या नमाजनंतर पोलिस लाइन्स परिसरात हा स्फोट झाला. स्फोटाच्या धक्क्याने मशिदीची एक बाजू कोसळली.
एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.स्फोटानंतर मशिदीच्या जमिनीवर ढिगारा पडलेला दिसत आहे. बचाव पथके आणि सुरक्षा दलांना या भागात रवाना करण्यात आले आहे. जखमींना प्राथमिक उपचारासाठी लेडी रीडिंग हॉस्पिटल पेशावरमध्ये हलवण्यात आले आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताकडे आहे हे ब्रह्मास्त्र !
शनि शिंगणापूरला १ कोटीचे दान करणारे ओदिशाचे मंत्री नबा दास गोळीबारात मृत्यूमुखी
अर्थसंकल्पात या गोष्टींमध्ये दिलासा मिळण्याचे संकेत
ठाकरे गट हेच हिंदूंचे एकमेव आशास्थान आहे?
तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा या भागात बराच प्रभाव असून यापूर्वी या संघटनेने येथे हल्ल्याची धमकीही दिली होती. या घटनेनंतरचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. यामध्ये जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे. या आधी २३ डिसेंबर रोजी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये आत्मघातकी हल्ला झाला होता, ज्यामध्ये एक पोलीस शहीद झाला होता. यासोबतच १० जण जखमी झाले होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे इस्लामाबादमध्ये मोठा हल्ला टळला असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.