महाराष्ट्रामध्ये ५०० हून अधिक पक्ष्यांची नोंद आहे. लवकरच या पक्ष्यांची माहिती मराठीमधून उपलब्ध होणार आहे. राज्यात आढळणारे आणि उपखंडात आढळणाऱ्या पक्ष्यांची सखोल माहिती मराठीतून उपलब्ध व्हावी म्हणून पक्षीकोश निर्मिती करण्यात येणार आहे. पक्षीकोश निर्मितीची कल्पना गोंदियाचे अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांची आहे. महाराष्ट्र पक्षीमित्र समूहातर्फे अनेक पक्षीमित्र या पक्षीकोशाच्या निर्मितीसाठी उत्सुक आहेत.
अनेक ठिकाणी काही पक्षांची माहिती गाईड स्वरूपात एक किंवा दोन पानात उपलब्ध आहे. पण पक्ष्यांची सखोल माहिती देणारी फारच कमी पुस्तके उपलब्ध आहेत. निसर्गाची आणि पक्ष्यांची माहिती मराठीतून उपलब्ध झाली तर ती अधिक सुलभ ठरेल. ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनीही पक्षीकोशाची निर्मिती केली असून त्यात विविध भागातील पक्षांची नावे नोंद केलेली आहेत. त्यापुढील टप्पा म्हणजेच पक्ष्यांची वर्णने, जोडीदार, अंडी, त्यांच्या सवयी, पक्षी कुठे आढळतो, विणीच्या हंगामातील वागणे, वैशिष्ट्ये अशी सखोल माहिती या कोशामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न असेल, असे खवले यांनी सांगितले. पुढच्या पिढ्यांसाठी मराठीतून वाचण्यासाठी साहित्य निर्माण व्हावे हा उद्द्येश असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
ज्येष्ठ अभिनेत्री सुनिता शिरोळेंना हवी आहे मदत
नीरज चोप्राचे नाव आता दिले जाणार ‘या’ संस्थेला
रेल्वे प्रवासासाठी तिकीट नापास, फक्त ‘पास’
परमबीर सिंग यांना चांदिवाल समितीने ठोठावला दंड
पक्षीकोशाची निर्मिती तीन टप्प्यातून केली जाईल. पहिल्या टप्प्यात तीन खंडांमध्ये राज्यातील पक्ष्यांची माहिती दिली जाईल. त्यानंतर भारतीय उपखंडातील माहिती मराठीतून लिहिण्यात येईल. पहिल्या टप्प्यातील पक्ष्यांची यादी प्रसिद्ध केली असून महाराष्ट्रातील मराठीतून लिहिणाऱ्या पक्षीमित्रांनी ते लिहिण्यात रस असल्यास पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
पक्षीकोश निर्मितीचा प्रकल्प मार्गदर्शक ठरेल, असे महाराष्ट्र पक्षीमित्रचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी सांगितले. राज्यभरातील विविध अभ्यासकांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. प्रकल्पासाठी माहितीसोबतच छायाचित्रांची आवश्यकता असेल त्यामुळे पक्षीमित्रांनी त्यासाठीही मदत करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.