मालदीव आणि भारत या दोन देशांमधील संबंध ताणलेले असतानाचं मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू हे चीन दौऱ्यावर गेले होते. चीनच्या दौऱ्यावरुन परत आलेले मुईझ्झू हे भारतविरोधात पुन्हा एकदा कठोर होताना दिसत आहेत. मुईझ्झू यांनी मालदीवमधील भारतीय सैन्य परत बोलवण्याचा सूर पुन्हा एकदा लावून धरला आहे. यासोबतच त्यांनी भारताला १५ मार्चचा अल्टिमेटम दिला आहे. यापूर्वी मालदीवने दोन महिन्यांपूर्वी भारतीय सैन्य हटवण्याची मागणी केली होती.
मुईझ्झू यांच्या सरकारने मालदीवमधील भारतीय सैन्य परत बोलवण्याचा प्रस्ताव भारताकडे पाठवला आहे. मालदीवने भारताला १५ मार्चपर्यंतचा वेळ दिला आहे. मुईझ्झू हे नुकतेच ५ दिवसांच्या चीनच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेतली होती. चिनी पर्यटकांनी मालदीवमध्ये मोठ्या प्रमाणात यावं असं आवाहन यावेळी मुईझ्झू यांनी केलं.
राष्ट्रपती कार्यालयातील सार्वजनिक धोरण सचिव अब्दुल्ला नाझिम इब्राहिम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राष्ट्रपती मुइझ्झू यांनी औपचारिकपणे भारताला १५ मार्चपर्यंत सैन्य मागे घेण्यास सांगितले आहे. भारतीय सैनिक मालदीवमध्ये राहू शकत नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मालदीव सरकारच्या धोरणाचा दाखला देत नाझिम म्हणाले की, राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुइज्जू आणि त्यांच्या प्रशासनाचे हे धोरण आहे.
मालदीवमध्ये निवडणुकीदरम्यान मुईझ्झू यांच्या पक्षाने भारत विरोधात प्रचार केला होता. मालदीवमधील भारतीय लष्कराच्या बाबतही त्यांनी प्रोपेगेंडा केला होता. निवडणुकीदरम्यान मुईझ्झू यांनी जनतेला आश्वासन दिलं होतं की, सत्तेत आल्यास भारतीय सैनिकांना परत पाठवलं जाईल. निवडून आल्यानंतर त्यांनी लगेच सैनिकांना परत बोलावण्याची औपचारिक विनंती भारत सरकारकडे केली होती.
मुईझ्झू यांच्या आधीच्या सरकारच्या विनंतीनुसारच, भारतीय सैनिकांची छोटी तुकडी मालदीवमध्ये पाठवण्यात आली होती. ही भारतीय टीम समुद्री सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात काम करते. मुईझ्झू हे चीन समर्थक मानले जातात. चीनला फायद्याचे ठरतील असे निर्णय ते घेताना दिसत आहेत. पण, यामुळे भारताची डोकेदुखी वाढणार आहे.
हे ही वाचा..
दीड वर्षापूर्वी सुईही टोचली नाही आणि टाकाही नाही
लोखंडवाला १२० फुटी डीपी रोडसाठी मुख्यमंत्री सकारात्मक
संसद घुसखोरी प्रकरण: नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंगनंतर प्रकरणाच्या मास्टरमाईंडचे नाव समोर
वडिलांचे नाव नीट न लिहिता येणारे वडिलांचा वारसा कसा चालवणार?
दरम्यान, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू यांनी अप्रत्यक्षपणे भारताला शनिवारी इशारा दिला होता. राष्ट्राध्यक्ष मुईझ्झू त्यांचा चीन दौरा संपवून मालदीवला परतले. पत्रकार परिषदेत त्यांनी बोलताना आम्ही लहान असू पण आम्हाला धमकावण्याचा परवाना त्यांना (भारत) दिलेला नाही, अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. पंतप्रधान मोदींच्या नुकत्याच झालेल्या लक्षद्वीप दौऱ्यावर मालदीवचे नेते आणि अनेक मंत्र्यांनी अपमानास्पद टिप्पणी केल्याने हा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणी मालदीव सरकारने गेल्या ७ जानेवारीला आपल्या तीन मंत्र्यांना त्यांच्या पदावरून निलंबितही केले होते.