भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांनी मंगळवारी बंगालच्या उपसागरातील मलबार नौदल कवायतींच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात केली. “तीन दिवसीय नैदल युद्धाभ्यासात, ऑगस्टमध्ये आयोजित केलेल्या पहिल्या टप्प्यात विकसित झालेला समन्वय आणि आंतर-कार्यक्षमता विकसित करण्याचा प्रयत्न आहे.” असे भारतीय नौदलाने सांगितले. चीनला रोखण्यासाठी तयार केलेल्या क्वाडचे चारही सदस्य एकत्रित युद्धाभ्यास करत असल्यामुळे चीनची चिंता वाढली आहे.
युद्धाभ्यासाचा पहिला टप्पा २६ ते २९ ऑगस्ट दरम्यान प्रशांत महासागरातील गुआम बेटावर आयोजित करण्यात आला. यात डिस्ट्रॉयर्स, फ्रिगेट्स, कॉर्वेट्स, पाणबुड्या, हेलिकॉप्टर, लांब पल्ल्याची सागरी गस्त विमानं, यूएस नेव्ही सील आणि भारतीय नौदलाच्या सागरी कमांडोसह एलिट स्पेशल फोर्सचा समावेश होता.
भारतीय नौदल दुसऱ्या टप्प्यात आयएनएस रणविजय, आयएनएस सातपुडा, पी-८१ लांब पल्ल्याची सागरी गस्त विमान आणि पाणबुडीसह भाग घेत आहे. यूएस नौदलाचे प्रतिनिधीत्व युएसएस कार्ल विन्सन सोबत युएसएस लेक चॅम्पलेन आणि यूएसएस स्टॉकडेल करतात. जपान जेएस कागा आणि जेएस मुरासामे यांच्यासह भाग घेत आहे. तर रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्हीने कवायतींसाठी एचएमएएस बल्लारत आणि एचएमएएस सिरियस पाठवले आहेत.
हे ही वाचा:
दोन ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांनाही आता मिळणार कोवॅक्सिन
पाकिस्तानी दहशतवाद्याला केली दिल्लीत अटक
जळगावात फुकटसेनेच्या ‘रणरागिणींचा’ भलताच प्रताप
वाहतूक नियम मोडणाऱ्यांना लावणार जबरदस्त ‘ब्रेक’
मलबार युद्धाभ्यासाची मालिका १९९२ मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात वार्षिक द्विपक्षीय नौदल सराव म्हणून सुरू झाली. वर्षानुवर्षे त्याची व्याप्ती आणि गुंतागुंत वाढली आहे. युद्धाभ्यासाच्या २००५ सालच्या सरावात, भारतीय आणि अमेरिकन नौदलाच्या विमानवाहक वाहकांनी प्रथमच एकत्र काम केले. २०१४ साली जपानी मेरिटाइम सेल्फ डिफेन्स फोर्स युद्धाभ्यासामध्ये कायमस्वरूपी सहभागी झाले. ऑस्ट्रेलियाने मागील वर्षी कायमस्वरूपी सदस्य म्हणून युद्धाभ्यासामध्ये सामील झाले. नौदलांनी यापूर्वी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात नोव्हेंबर २०२० मध्ये मलबार बॅनरखाली क्लिष्ट नौदल युद्धाभ्यास केला होता.