मंगळवारी ठाणे महापालिकेच्या ऑनलाईन सभेत राडा झाला. आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे आणि दुजाभाव दाखविल्यामुळे आंदोलन झाले.
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी हे आंदोलन केले. महापौरांनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आंदोलन केले. अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होत नाही. लसीकरणातील दुजाभाव, स्मशानातील भ्रष्टाचार, नगरसेवकांची कामे याबद्दल ठाणे पालिका आयुक्तांकडून ठोस पावले उचलली जात नाहीत या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी २ ऑगस्टला पालिका मुख्यालयात आंदोलन केले होते. त्यावेळी आयुक्तांनी मागण्या मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन दिले; मात्र आश्वासनांची पूर्तता न झाल्याने संतप्त नगरसेवकांनी ऑनलाईन महासभा सुरू असताना नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये घोषणाबाजी करत महासभा उधळून लावली.
ठाणे शहरामध्ये केवळ शिवसेना शाखांमध्येच आयोजित होणारी लसीकरण शिबिरे, विरोधी पक्षासह इतर पक्षांना मिळणारी दुय्यम वागणूक, खोळंबलेला नगरसेवक निधी आणि त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या नगरसेवकांची होणारी मुस्काटदाबी याविरोधात हे आंदोलन होते. आमचे आंदोलन हे विकास कामांसाठी आहे; मात्र विरोधकांनी आवाज उठवल्यास सचिवांकडून ऑनलाईन महासभेत नगरसेवकांचा आवाज म्युट केला जात आहे. त्यामुळे सचिवांवर कारवाई व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक सुहास देसाई यांनी केली. महापालिकेत शिवसेनेला पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे गोंधळ घालणाऱ्यांची आम्हाला गरज नाही, असे महापौर नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना सांगितले.
हे ही वाचा:
तालिबानवर विश्वास ठेवता येणार नाही
रौप्य पदक जिंकूनही मोदींची रवी दहियाकडे तक्रार का?
ये है उद्धव का “नया” महाराष्ट्र
स्वरा भास्करच्या अजब तर्कावर अरेस्ट स्वरा वायरल
छोट्या ठेकेदारांची बिले थांबवून मोठ्या ठेकेदारांना पैसे घेऊन बिले अदा करण्यात आल्याचा आरोप सभागृह नेते अशोक वैती यांनी महासभेत केला. महापौरांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आश्वासन दिल्यावरच हा वाद थांबला. कोरोनामुळे पालिकेची आर्थिक परिस्थिती ठीक नसताना शिवसेनेच्या काही मर्जीतील नगरसेवकांनी ग्रीन कार्पेट अंथरले आहे. अर्थसंकल्पात तरतूद नसतानाही रघुनाथनगर भागातील विविध प्रस्ताव जून महिन्यात झालेल्या महासभेत आयत्या वेळेचा विषय म्हणून मंजूर करण्यात आले आहेतअशी बाब समोर आली आहे.