१९९२ साली महाराष्ट्र केसरी हा सन्मान मिळवणारे, ज्यांचा सन्मान शासनाने शिवछत्रपती पुरस्कार देऊन केला त्या आप्पालाल शेख यांचे अल्पशा आजारामुळे निधन झाले. भल्या भल्या पैलवानांना आस्मान दाखवणारे आप्पालाल शेख हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावातील रहिवासी होते. त्यांचे बंधू इस्माईल शेख हे देखील महाराष्ट्र केसरी पैलवान होते.
इस्माईल यांनी कुस्तीच्या सरावासाठी कोल्हापूर गाठलं. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून आप्पालाल देखील कोल्हापूरला गेले. तिथे त्यांना देखील कुस्तीची आवड निर्माण झाली. १९८० साली आप्पालाल यांचे बंधू इ्स्माईल यांनी महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला. भावाचा वारसा पुढे नेत पुढे १९९२ साली आप्पालाल देखील महाराष्ट्र केसरी झाले. त्याआधी अनेक छोट्या मोठ्या कुस्त्या आप्पालाल यांनी लढल्या.
बल्गेरिया आणि इराण येथे झालेल्या विश्वचषक कुस्ती स्पर्धेसाठी देखील आप्पालाल यांची निवड झाली. त्यात त्यांना यश आले नाही. मात्र १९९१ साली न्यूझिलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आप्पालाल यांनी भारतासाठी सुवर्णपदक देखील पटकावलं. आप्पालाल यांचे पुतणे मुन्नालाल शेख यांनी देखील २००२ साली महाराष्ट्र केसरीची गदा पटकाविली. एकाच परिवारात तीन महाराष्ट्र केसरी गदा आहेत.
आप्पालाल जेव्हा लंगोट बांधून लाल मातीत उतरत तेव्हा समोरच्या पहिलवानांचे धाबे दणाणत असे. हाबुक ठोकून कुस्तीला सुरुवात झाली आहे की समोरच्याची पाठ जमिनीला लावल्याशिवाय हा गडी कधीच मागे हटला नाही.
हे ही वाचा:
जम्मू-काश्मीरमध्ये अफगाणिस्तानातून ड्रग्जची तस्करी?
कॅमेरामन सौंदडे यांचे म्युकरमायकोसिसमुळे निधन
स्वतःबद्दल ऐकण्याची शक्ती आहे तेवढेच दुसऱ्याबद्दल बोलावे
अफगाणिस्तानात तालिबान; त्यामुळे जिन्स ‘बॅन’
जवळपास १० महिन्यांपूर्वी आप्पालाल शेख यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. समाजातील दानशूर लोकांनी त्यांना मदतीचा हात दिला होता.ज्यानी कुस्तीसाठी सर्व काही लावलं आज त्यांची तीनही पोरं कुस्तीच्या फडात आपलं नशीब आजमावत आहेत. वडीलांचा ऑलम्पिक पदक मिळवण्याचा अपुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा असल्याची प्रतिक्रिया आप्पालाल यांचा मुलगा गौसपाक यांने दिली. गौसपाक सोबत अशफाक आणि अस्लम हे दोघे कुस्तीचा सराव करतात.