पोलिसांची कोविड-१९ प्रतिबंधात्मक नियम तोडणाऱ्यांच्या विरोधात धडक कारवाई

पोलिसांची कोविड-१९ प्रतिबंधात्मक नियम तोडणाऱ्यांच्या विरोधात धडक कारवाई

७६७ रिक्षावाल्यांवर दंडाचा बडगा

महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत कमी होत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ व्हायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे शासनाने त्याविरोधातील कारवाई तीव्र करायला सुरूवात केली आहे. सार्वजनिक ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शासनाकडून कारवाई केली जात आहे. याच मोहिमेत मास्क न वापरता रिक्षा चालवणाऱ्या ७६७ रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत तब्बल ₹ ३ लाख ८० हजार एवढा दंड जमा झाला आहे.

हे ही वाचा:

राज्यात पुन्हा नाईट कर्फ्यू?

रिक्षावाल्यांप्रमाणेच गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर देखील ‘बृ.मुं.म.पा’ने कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रवास करताना सोशल डिस्टंसिंग न पाळणे, मास्क न वापरणे अशी कृत्ये करून, कोरोनाप्रतिबंधात्मक नियम धाब्यावर बसवणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करायला सुरूवात केली आहे. दिनांक १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी या काळात रेल्वे आणि पालिका प्रशासनाने ४६१८ प्रवाशांवर कारवाई केली.

शनिवारी राज्यात ८,२८१ नव्या कोविड-१९ रुग्णांची नोंद झाली, तर ४० रुग्णांचा मृत्यु झाला. कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड प्रतिबंधात्मक उपायांचे पालन न करणाऱ्या लोकांवर सक्त कारवाई करण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहेत. लॉकडाऊन पुन्हा करायला लागू नये याची खबरदारी नागरिकांनी नियमांचे पालन करून बाळगावी असेही सांगण्यात आले आहे.

Exit mobile version