वणीच्या सप्तश्रृंगी देवीचा प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथात समावेश होणार असून यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथामध्ये यंदा ‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ यावर साकारण्यात येणार आहे. यामध्ये लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वणीच्या सप्तश्रृंगी देवीचा चित्ररथात समावेश असणार आहे.
२६ जानेवारी निमित्त प्रजासत्ताक दिनी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या पथसंचलनाकडे देशवासीयांचे लक्ष लागलेले असते. पथसंचलनात सहभागी होणारे राज्य आणि मंत्रालये आपापल्या परीने उत्तमोत्तम आणि नवनवीन संकल्पना निवडतात ,कलाकार त्या संकल्पनांना मूर्त रूप देऊन,हुबेहूब साकारून पाहणाऱ्यांना मंत्रमुग्ध करतात.
महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी ‘साडेतीन शक्तिपीठे स्त्रीशक्ती जागर’ या संकल्पनेची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तीपिठांचे दर्शन यावेळी सर्व देशवासीयांना होणार आहे. ही महाराष्ट्रातील शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. प्रजासत्ताकदिनी कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, दिल्लीत कर्तव्यपथावर होणाऱ्या तुळजाभवानीचे श्रीक्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तश्रृंगी देवीची प्रतिकृती या चित्ररथात असणार आहे. त्यामुळे२६ जानेवारीच्या पथसंचलनाकडे सर्वच देशवासीयांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा:
भारतीय अर्थव्यवस्था होणार इतक्या डॉलरची
महाराष्ट्र मच्छिमार संघाच्या संचालकपदी रामदास संध्ये यांची निवड
गूढ उकलले; बेपत्ता असलेल्या सदिच्छा सानेचा खून झाला!
या वर्षीची संकल्पना, रेखाचित्रे आणि त्रिमितीय प्रतिकृती तुषार प्रधान आणि रोशन इंगोले या युवक मूर्तिकार आणि कलादिग्दर्शक यांनी तयार केली आहे. त्यांच्यासोबत ‘शुभ एड’ चे संचालक नरेश चरडे आणि पंकज इंगळे हे भव्य प्रतिकृतीचे काम सांभाळत आहेत.३० जणांचा समावेश असलेल्या, युवक मूर्तिकार आणि कलाकारांच्या टीमला घेऊन राहुल धनसरे मेहनत घेऊन २६ जानेवारीपर्यंत महाराष्ट्राचा चित्ररथ पूर्ण करण्याचे काम करत आहेत.
सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे आणि सहकारी यांच्या सहकार्याने हा चित्ररथ पूर्णत्वास येणार आहे. तेव्हा तीनच दिवसांनी येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.