भारताचा शेजारी असलेला बांगलादेशमध्ये सध्या अस्थिरता असून येथील आंदोलकांकडून हिंदूंना लक्ष्य केलं जात असल्याची बाब समोर आली आहे. हिंदू मंदिरांची तोडफोड केल्याच्या घटनाही वारंवार बांगलादेशमध्ये घडत आहेत. अशातच आता बांगलादेशातील एका मदरशाच्या विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. बांगलादेशमधील तीन हिंदू मंदिरांची तोडफोड केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. रब्बी हुसेन असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
बांगलादेशमधील दोन मंदिरातील मूर्ती आणि इतर वस्तूंची तोडफोड केल्यानंतर तिसऱ्या मंदिराची तोडफोड करताना १८ वर्षीय रब्बी हुसेन याला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना राजशाही बाघा उपजिल्हातील पकुरिया आणि कालीग्राम भागातील मंदिरांमध्ये शुक्रवारी सकाळी घडली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रब्बी हुसेन याने पकुरिया युनियनमधील पकुरिया पालपारा, घोषपारा आणि कालीग्राम भागातील हिंदू मंदिरांचे कुलूप तोडले आणि मंदिरांमधील मूर्ती आणि इतर वस्तूंची तोडफोड केली. कालीग्राम सर्वजनीन दुर्गा मंदिर, पणिकामारा मंदिर आणि पकुरिया मंदिर अशी लक्ष्यित मंदिरांची नावे आहेत. अटकेनंतर हुसेन याने सांगितले की, बांगलादेशात आलेला पूर हा भारताने सोडलेल्या पाण्यामुळे आल्याच्या अफवांमुळे आपण मंदिरांना लक्ष्य केले.
हुसेन याला बाग नगरपालिकेतील कलीग्राम पुंडरीपारा येथील मंदिराची तोडफोड करताना रंगेहात पकडण्यात आले. मंदिर समितीचे अध्यक्ष अरुण सरकार यांनी रब्बीला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. उपजिल्हा पूजा सेलिब्रेशन कमिटीचे अध्यक्ष सुजित कुमार पांडे यांनी खबर मिळताच तात्काळ तिन्ही मंदिरांना भेट दिली. या घटनेबाबत बोलताना ते म्हणाले की, रब्बी हुसेनने भारताने सोडलेल्या पाण्यामुळे देशात आलेल्या पुराच्या अफवा पाहून मंदिरांवर हल्ला केल्याची कबुली दिली आहे. तसेच हे काम त्याने एकट्याने केल्याचे पोलीस ठाण्यात उपस्थित लोकांसमोर कबूल केले आहे. असे का केले असे विचारले असता रब्बीने सांगितले की, त्याने आपल्या बहिणीच्या फोनवर पाहिले की भारतातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बांगलादेशातील लोक पुराच्या पाण्यात बुडत आहेत. हा व्हिडिओ पाहून त्याला रात्रभर झोप लागली नाही. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता न आल्याने तो मंदिरे फोडायला निघाला.
हे ही वाचा :
नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचे निधन
कन्नड आरोपी अभिनेत्याला तुरुंगात मिळतेय ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’, फोटो व्हायरल !
विकसित भारताचा पाया मजबूत होतोय !
पुण्यात कोयता गँगचा हैदोस, सहाय्यक पोलीस निरीक्षकावरच हल्ला !
या संदर्भात बाघा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी (ओसी) अबू सिद्दीक यांनी सांगितले की, तोडफोडीच्या घटनेत रब्बी हुसैन याच्या नावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर न्यायालयाने त्यांची रवानगी तुरुंगात केली होती. त्याच्यासोबत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.
बांगलादेशला पुराच्या संकटाचा सामना करावा लागत असून देशातील काही भारतविरोधी मंडळांनी अफवा पसरवली होती की, पूरस्थिती ही त्रिपुरातील गुमती नदीवरील डुंबूर जलविद्युत प्रकल्पातून सोडण्यात आल्याने आली आहे. या अफवेवरून विद्यार्थ्यांनी भारताविरोधात निदर्शने केली होती. दुसरीकडे भारताने हा दावा साफ खोडून काढला आहे.