एलअँडटी बांधणार उत्तराखंडमध्ये रेल्वे

एलअँडटी बांधणार उत्तराखंडमध्ये रेल्वे

लार्सन अँड टूब्रोच्या बांधकाम विभागाला रेल विकास निगम लिमिटेड कडून उत्तराखंडमधील रेल्वे बांधकामाचे कंत्राट मिळाले आहे. या बांधकामाचा प्रस्तावित खर्च अंदाजे ₹२,००० ते ₹५,००० कोटी आहे अशी माहिती एका अभियांत्रीकी अधिकाऱ्याने दिली आहे.

या कामात, नव्याने बांधल्या जाणाऱ्या ब्रॉड गेज लाईनकरिता इतर बांधकामे करण्याचे कंत्राट एल अँड टी या कंपनीला देण्यात आले आहे. हा नवा रेल्वेमार्ग ऋषिकेश ते करणप्रयाग यांच्या दरम्यान बांधला जाणार आहे. हा मार्ग हिमालयातील खडतर भूमार्गावरून जाणार आहे.

या कंपनीच्या बांधकाम विभागाचे संचालक आणि उपाध्यक्ष एस व्ही देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषिकेश ते करणप्रयाग या दरम्यान बांधल्या जाणाऱ्या रेल्वेमार्गामुळे केवळ या दोन तीर्थक्षेत्रांचा फायदा होणार नाही, तर त्याबरोबच दुर्गम भागातील लोकांचा देखील फायदा होणार आहे. यामुळे या क्षेत्रांत देखील व्यापारी केंद्रे उभी राहू शकतील, ज्याचा इथल्या स्थानिक रहिवाश्यांना देखील फायदा होईल.

या प्रकल्पासाठी लागणारा अंदाजे कालावधी ६० महिन्यांचा आहे. मागील काही वर्षांपासून रेल्वेने विविध प्रकल्पांची कामे हाती घेतली आहेत. नवे मार्ग सुरू करणे, मार्गांचे दुहेरीकरण, विद्युतीकरण अशी विविध कामे रेल्वे वेगाने करत आहे.

Exit mobile version