कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची बाधा कमी होत असताना लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. देशाची आर्थिक परिस्थती रुळावर येत असताना जुलैमधील नवीन नोकरभरती ही उच्चांक गाठणारी ठरली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर नोकरभरतीमध्ये ११ टक्क्यांची वाढ झाल्याचे एका अहवालातून दिसून आले आहे.
‘नोकरी जॉबस्पीक’ने केलेल्या अहवालानुसार एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये नोकरी भरतीची घसरण सुरू होती. या घसरणीनंतर जूनमध्ये नोकरभरतीत १५ टक्के वाढ आणि जुलैमध्ये ११ टक्के वाढ झालेली दिसून आली. जुलैमध्ये झालेली वाढ ही सलग दुसऱ्या महिन्यातील चांगली वाढ आहे. दुसऱ्या महिन्यातील निरंतर वाढीच्या क्रमाने हा भारतातील रोजगार बाजारपेठेने कोरोनापूर्व पातळीच नव्हे तर आजवरची उच्चांकी वाढ दाखवली आहे.
‘नोकरी डॉट कॉम’ या संकेतस्थळावरील प्रस्तुत केल्या जाणाऱ्या नोकरीच्या संधी आणि भरल्या जाणाऱ्या जागांच्या आधारे ‘नोकरी जॉबस्पीक’ने हा अहवाल तयार केला आहे. अहवालानुसार माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील नोकऱ्यांच्या संधीत जून महिन्याच्या तुलनेत १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बायोटेक, क्लिनिकल रिसर्च आणि औषधे ही क्षेत्रे टाळेबंदीच्या प्रभावात आली नसली तरी या क्षेत्रांच्या नोकरभरतीत पाच टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. माध्यम क्षेत्र आणि मनोरंजन क्षेत्रात १५ टक्क्यांची कपात झाल्याचे अहवालातून समोर आले आहे.
हे ही वाचा:
तालिबानने एक शहरही काबीज केले
हिरोशिमा, योशिनोरी आणि ऑलिम्पिक
दरडग्रस्तांना मदत करण्यात ठाकरे सरकार अपयशी
‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर हास्यजत्राच्या कलाकारांचा कल्ला
जागतिक रोजगार स्थितीचा वेध घेणाऱ्या ‘मायकेल पेज’ या संस्थेच्या अहवालानुसार एप्रिल ते जून या तीन महिन्यांमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकरभरतीचे प्रमाण हे ३८ टक्के होते. ग्राहक संपर्काचे तंत्रज्ञान, वित्तीय तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये नोकरभरतीने वेग पकडला आहे. लिंक्डइन इंडियाच्या अहवालानुसार २०२० मध्ये म्हणजेच टाळेबंदीच्या काळात उपलब्ध संधीसाठी अर्ज करण्याचे प्रमाण दुपटीने वाढले होते, परंतु आता तुलनेने हे प्रमाण ०.६ पट इतके आहे.