कालपासून मुंबई पुण्यासह राज्यातील पाच महापालिकांच्या क्षेत्रात अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी अनेक विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. अर्ज अपलोड करण्यात अडथळे आणि संकेतस्थळ चालत नसल्याच्या तक्रारी अनेक विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या. अकरावीच्या सीईटी परीक्षेवरून झालेल्या गोंधळावरही विद्यार्थ्यांनी नाराजी दर्शवली. रोजच्या नवीन गोंधळामुळे अकरावीचा प्रवेश कधी होईल याची प्रतिक्षा सध्या विद्यार्थी करत आहेत.
मुंबई, पुणे, नाशिक, पिंपरी- चिंचवड, नाशिक, नागपूर आणि अमरावती अशा पाच पालिका क्षेत्रांतील कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रियेला काल सकाळी ११ वाजता सुरूवात झाली. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रवेश प्रक्रियेचे उद्घाटन केले. त्यानंतर मात्र विद्यार्थ्यांना संकेतस्थळ वापरताना त्रास सहन करावा लागला.
अनेकांकडे संकेतस्थळ चालत नव्हते तर काही विद्यार्थ्यांचे अर्ज अपलोड करण्यात अडचणी आल्या. अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतरही त्यांना अर्ज अपूर्ण असल्याचे मेसेज आले. पुन्हा अर्ज भरावा लागल्यामुळे विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींकडून संताप व्यक्त करण्यात आला.
हे ही वाचा:
…आणि डॉक्टरच्या खात्यातून गायब झाले पैसे
अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गानी यांचा राजीनामा
महाराष्ट्राच्या मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे संकेतस्थळ सकाळपासून सुरळीत सुरू होते. काही तांत्रिक अडचणी आल्या असतील; पण त्याबद्दलच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या नाहीत. पहिल्याच दिवशी ९४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशाचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.
पहिल्या दिवशी सर्वात जास्त प्रवेश नोंदणी मुंबई महापालिका क्षेत्रातून झाली. मुंबईतून ६६ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यानंतर पुणे आणि नाशिक या पालिका क्षेत्रातून अनुक्रमे १८ हजार ५६५ आणि चार हजार ४८५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंद केली आहे.