लंडनमधील हीथ्रो विमानतळ वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे बंद करण्यात आले आहे. शुक्रवारी यासंदर्भात माहिती समोर आली आहे. विमानतळाच्या जवळील विद्युत उपकेंद्राला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण विमानतळाचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर आता विमानतळ २४ तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर येणारी आणि जाणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
गुरुवारी रात्री स्थानिक वेळेनुसार ११:३० वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी ५ वाजता) आग लागल्याची माहिती मिळाली. याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली आणि शुक्रवारी पहाटे २ वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी ७:३० वाजता) विमानतळ बंद करण्याची घोषणा करण्यात आली. “विमानतळाला वीजपुरवठा करणाऱ्या सबस्टेशनला लागलेल्या आगीमुळे, हीथ्रोमध्ये मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित झाला आहे. आमच्या प्रवाशांची आणि सहकाऱ्यांची सुरक्षितता राखण्यासाठी, हीथ्रो २१ मार्च रोजी रात्री ११:५९ पर्यंत बंद राहील. प्रवाशांना विमानतळावर प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे आणि अधिक माहितीसाठी त्यांनी त्यांच्या एअरलाइनशी संपर्क साधावा. गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत,” अशी अधिकृत घोषणा हीथ्रो विमानतळाकडून करण्यात आली आहे.
विमानतळ अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, विमानसेवा पूर्ववत करण्याबाबत अधिक माहिती उपलब्ध झाल्यावर प्रवाशांना कळवले जाईल. ही बाब प्रवाशांसाठी निराशाजनक असून आम्ही खात्री देऊ इच्छितो की, आम्ही परिस्थिती सोडवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहोत.
दरम्यान, युरोपमधील सर्वात व्यस्त विमानतळ कधीपासून पुन्हा सुरू होईल याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही, असे सध्या बोलले जात आहे. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइट रडारनुसार, विमानतळ बंद झाल्यामुळे हीथ्रोला जाणाऱ्या किमान १२० विमानांचे मार्ग बदलावे लागणार आहेत. दरम्यान, हीथ्रोपासून जवळजवळ तीन किलोमीटर उत्तरेस असलेल्या ठिकाणी आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
हे ही वाचा :
मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला एक कोटींची खंडणी घेताना अटक
हमासचा प्रचार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या बदर खानच्या हद्दपारीला स्थगिती
२०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारताने लावली बोली
अनिल परब तुमच्या सरदारांना विचारा संजय राठोडांना क्लीन चीट का दिली?
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, या भीषण आगीमुळे पश्चिम लंडनमधील हजारो घरांचा वीजपुरवठाही खंडित झाला आहे. “आगीमुळे मोठ्या संख्येने घरे आणि स्थानिक व्यवसायांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे आणि आम्ही आमच्या भागीदारांसोबत व्यत्यय कमी करण्यासाठी जवळून काम करत आहोत,” असे लंडन अग्निशमन दलाचे सहाय्यक आयुक्त पॅट गॉलबॉर्न यांनी सांगितले.