लॉकहीड मार्टिन या अमेरिकेतील लष्करी विमाने बनवणाऱ्या कंपनीने भारतातील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या कंपनीशी एका करारावर स्वाक्षरी केली आहे. लॉकहीड मार्टिनचे भारताशी असलेले संबंध बळकट करण्याच्या दृष्टीने हा करार महत्वाचा आहे.
अमेरिकेत निर्माण होणारी अनेक लष्करी विमाने ही लॉकहीड मार्टिन ही कंपनी बनवते. या कंपनीने बनवलेली एफ-१८ ते एफ-३५ सारखी विमाने लष्करी दृष्ट्या सर्वात घातक मानली जातात. एफ-२२ ही विमाने इतकी प्रगत आहेत की या विमानांची खरेदी फक्त अमेरिकेच्या हवाई दलाकडून होते. इतर कोणत्याही देशाला विक्रीसाठी अजून परवानगी मिळालेली नाही.
भारताकडे सध्या उपलब्ध असलेल्या लहकारी विमानांपैकी सगळी विमाने ही रशियन आणि फ्रेंच बनावटीची आहेत. तेजस हे पहिलेच विमान संपूर्ण भारतीय बनावटीचे आहे जे भारतीय हवाई दलामध्ये सामील होणार आहे. परंतु तेजस छोट्या पल्ल्यासाठीचे विमान असून लांब पल्ल्यासाठीची सर्व विमाने ही आयात केलेली आहेत. रशियन आणि फ्रेंच कंपन्यांपेक्षा अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिनची विमाने जास्त प्रगत आहेत असे मानले जाते.
भारत ही वेगाने वाढत असलेली अर्थव्यवस्था आणि लष्करी शक्ती आहे. त्यामुळे भारताला जास्तीत जास्त विमानांची गरज भविष्यात भासेल. त्यामुळे अशा देशाशी चांगले संबंध असावेत असा लॉकहीड मार्टिनचा प्रयत्न आहे.