ब्राझिलचे महान फुटबॉलपटू आणि तीनवेळा आपल्या देशाला विश्वविजेतेपद मिळवून देणारे खेळाडू पेले यांचे गुरुवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. इन्स्टाग्रामवर त्यांची मुलगी केली नासिमेन्टो यांनी पेले यांच्या निधनाची बातमी दिली.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पेले यांच्या शरीरातून गाठ बाहेर काढण्यात आल्यानंतर त्यांच्यावर केमोथेरपीचे उपचार सुरू होते. २०१२मध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती मात्र ती अयशस्वी ठरली. त्यामुळे त्यांना चालणे मुश्कील झाले होते. फेब्रुवारी २०२०मध्ये पेले यांचे पुत्र एडिनो यांनी म्हटले होते की, शारीरिक त्रासामुळे ते निराश झाले होते. अखेर गुरुवारी अनेक अवयव निकामी झाल्यामुळे पेले यांचे निधन झाले. ज्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, तेथील डॉक्टरांनी पेले यांच्या निधनाचे वृत्त दिले. गेल्या काही वर्षांपासून त्यांना मूत्रपिंड आणि ग्रंथींच्या रोगाने पछाडले होते.
पेले या नावाने ते जगभर ओळखले जात असले तरी त्यांचे मूळ नाव एडसन अरान्तेस डो नासिमेन्टो होते. त्यांच्या नावावर १२८१ विश्वविक्रमी गोल होते. त्यात ९२ सामन्यांत त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले आणि त्यात ७७ गोल मारले. ते एकमेव फुटबॉलपटू आहेत ज्यांनी तीनवेळा विश्वविजेतेपदाचा आनंद मिळविला. १९५८, १९६२, १९७०मध्ये त्यांनी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा जिंकली. वर्ष २०००मध्ये त्यांना शतकातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून फिफा या जागतिक फुटबॉल संघटनेने गौरविले.
हे ही वाचा:
लव्ह जिहादची वाढती प्रकरणे, हिंदू मुलींचे कुठे चुकते आहे?
स्थायी समिती अध्यक्षांचा वचपा?
चित्रपट निर्माता-दिग्दर्शक नितीन मनमोहन यांचे निधन
आमच्याशी निर्दयीपणे कसे काय वागू शकता? उद्धव ठाकरे हताश!
ब्राझिलियन फुटबॉल संघटनेने म्हटले आहे की, महान खेळाडूच्या व्यतिरिक्तही पेले खूप काही होते. त्यांनी आपल्या वडिलांना विश्वचषक जिंकून देईन असे वचन दिले होते. ते पूर्ण करताना त्यांनी तीनवेळा विश्वचषक जिंकून दिला.
त्यांनी आम्हाला नवा ब्राझिल दिला. अवघ्या १७ वर्षांचे असताना १९५८मध्ये त्यांनी ब्राझिलला पहिला विश्वचषक जिंकून दिला. या स्पर्धेत बाद फेरीपासून ते मुख्य संघात खेळू लागले. उपांत्यपूर्व फेरीत वेल्सवर १-० अशा मिळविलेल्या विजयात पेले यांचा तो एकमेव गोल होता. उपांत्य फेरीत त्यांनी फ्रान्सविरुद्ध हॅट्ट्रिक नोंदविली तर अंतिम फेरीत स्वीडनवर ५-२ अशी मात करताना त्यांनी २ गोल केले.
पेले यांनी सॅन्टोस या क्लबकडून पदार्पण केले. त्यावेळी ते अवघ्या १५ वर्षांचे होते. पुढील १९ वर्षांत त्यांनी या क्लबसाठी ६४३ गोल केले. बीबीसीने घेतलेल्या मतचाचणीत पेले हे मेस्सी, रोनाल्डो, मॅराडोना आणि जोहान क्रायफ यांच्यापेक्षाही लोकप्रिय ठरले होते.