ट्विटर या सोशल मिडीआय कंपनीच्या प्रमुख पदी भारतीय वंशाच्या पराग अगरवाल यांची झालेली नियुक्ती ताजी असतानाच, आता आणखीन एका जगप्रसिद्ध कंपनीच्या प्रमुख पदी भारतीय वंशाच्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही भारतीय वंशाची व्यक्ती एक महिला आहे. जगप्रसिद्ध फॅशन ब्रँड असलेल्या ‘शॅनल’ च्या प्रमुख पदी लीना नायर या आता विराजमान होणार आहेत.
नायर यांची ही नियुक्ती सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. जानेवारीमध्ये लीना नायर या ‘शॅनल’ च्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अर्थात सीईओ पदाचा कार्यभार आपल्या हाती घेणार आहेत. या आधी ५२ वर्षांच्या नायर या युनिलिव्हर कंपनीच्या चीफ ह्युमन रिसोर्स ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या. युनिलिव्हरच्या त्या पहिल्या महिला चीफ ह्युमन रिसोर्स ऑफिसर होत्या. तर त्या सोबतच आशियाई वंशाच्या आणि सर्वात तरुण अशा पहिल्या चीफ ह्युमन रिसोर्स ऑफिसर होत्या.
हे ही वाचा:
बापरे!! दिवसाला २२९ बॅंकिंग फसवणूक घटना
‘दोन वर्षांत राज्य सरकारने न्यायालयाच्या आदेशांचे पालन का केले नाही?’
मुंबईत १६ दिवसांसाठी कलम १४४ लागू
ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांची मृत्यूशी झुंज अपयशी
महाराष्ट्राशी विशेष नाते
लीना नायर यांचे आपल्या महाराष्ट्राशी एक विशेष नाते आहे. लीना नायर या आपल्या मराठी मातीतल्या कोल्हापूरच्या आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरला झाले आहे. तर महाविद्यालयीन शिक्षण सांगलीमधून पूर्ण केले आहे. सांगलीच्या वालचंद इंजिनियरिंग कॉलेज मधून त्यांनी इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. तर नंतर जमशेदपूर येथील एक्सएलआरआय मधून त्यांनी मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. त्यावेळी त्यांनी महाविद्यलयातून प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक पटकावले होते.