‘राफा रिकामे करा, नाहीतर घुसतो!’

इस्रायलचा पॅलेस्टिनी नागरिकांना आदेश

‘राफा रिकामे करा, नाहीतर घुसतो!’

इस्रायलने अमेरिका आणि अन्य देशांचा वाढता दबाव झुगारून देत गाझाच्या दक्षिणेकडील शहर राफा रिकामे करण्याचा नवा आदेश जाहीर केला आहे. त्यामुळे हजारो लोकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होण्याशिवाय पर्यायच शिल्लक राहिलेला नाही. इस्रायलने आधीच उद्ध्वस्त केलेल्या उत्तर गाझामध्ये ते पुन्हा घुसणार असल्याचेही जाहीर केले आहे. हमास संघटना येथे पुन्हा एकदा एकजूट होत असल्याचा दावा इस्रायलने केला आहे.

इस्रायलने आता राफाच्या पूर्वेकडील एक तृतियांश भाग रिकामा केला आहे. जिथे गाझामधील अनेक नागरिक स्थलांतरित झाले आहेत. इस्रायलने राफावर संपूर्ण ताबा मिळवल्यास मानवी मदतकार्य ठप्प होईल आणि त्याचा फटका हजारो पॅलिस्टिनींना बसेल, अशी भीती संयुक्त राष्ट्रे आणि अन्य देशांनी व्यक्त केली आहे. सद्यस्थितीत १४ लाखांहून अधिक पॅलिस्टिनी नागरिक राफामध्ये शरण आले आहेत. त्यातील बहुतांश इस्रायलच्या हल्ल्यांतून स्वतःचा बचाव करून येथे आले आहेत.

आता राफा शहरही रिकामे करण्यास सांगितल्याने त्यांना पुन्हा उत्तर गाझा भागात जावे लागेल. येथील अनेक भाग इस्रायलच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झाले आहेत. तर, हा आदेश मिळायच्या आधीच राफामधून एक लाख १० हजार पॅलिस्टिनी नागरिक निघाले आहेत. ‘आम्ही येथे काय करणार? सर्व मरत नाही तोपर्यंत आम्ही वाट पाहणार का? त्यामुळे आम्ही येथून जाण्याचा निर्णय घेतला आहे. हेच योग्य आहे,’ अशी प्रतिक्रिया राफा शहरातून विस्थापित झालेले रहिवासी हनान अल सतारी यांनी दिली. तर, ‘गाझामध्ये कोणतेही ठिकाण इस्रायली लष्करापासून वाचलेले नाही. ते प्रत्येक वस्तूला लक्ष्य करतात,’ असे अबू युसुफ अल-देरी यांनी सांगितले.

हे ही वाचा:

बंगाल म्हणजे बॉम्बचे घर? भाजपा नेत्याच्या घरातच बॉम्ब पेरले

खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येप्रकरणी चौथ्या भारतीयाला अटक!

‘उद्धव ठाकरे हा निलाजरा माणूस’

‘निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आम्हाला लोकानुनयाची गरज नाही’!

राफावर आक्रमण करण्यासाठी आम्ही इस्रायलला शस्त्रपुरवठा करणार नाही, असे जो बायडेन यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. ज्या प्रकारे, हमासविरोधात इस्रायल युद्ध करते आहे, त्यानुसार, नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन झाले आहे, त्याचे सबळ पुरावे आमच्याकडे आहेत, असे बायडेन म्हणाले.

Exit mobile version